मिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:59 AM2018-11-21T03:59:28+5:302018-11-21T04:00:49+5:30
हिरवी मिरची परत करायला पाठविल्याचा रागात धारावीत ८ वर्षांच्या मुलाने शनिवारी दुपारी घर सोडले. मात्र, धारावी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा चिमुरडा अवघ्या २४ तासांत सुखरूप घरी पोहोचला.
मुंबई : हिरवी मिरची परत करायला पाठविल्याचा रागात धारावीत ८ वर्षांच्या मुलाने शनिवारी दुपारी घर सोडले. मात्र, धारावी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा चिमुरडा अवघ्या २४ तासांत सुखरूप घरी पोहोचला.
धारावी येथील महात्मा गांधी चाळ परिसरात मेहर आबताब आलम शेख (२९) या पती आणि ४ मुलांसोबत राहतात. त्या परिचारीका आहेत. शनिवारी १७ तारखेला दुपारी ४च्या सुमारास त्यांनी आपला ८ वर्षांचा मुलगा साहिल (नावात बदल) याला घराजवळील दुकानात सामान आणण्यास पाठविले. मात्र, हिरवी मिरची घरात असूनही तो ती विकत आल्याने शेख यांनी त्याला मारले. मिरची परत करण्यास सांगितले.
साडेपाचच्या सुमारास तो मिरची परत करायला गेला, तो घरी परतला नाही. शोधाशोध करूनही तो न सापडल्याने अखेर कुटुंबीयांनी रात्री उशिरा धारावी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शोध सुरू केला. धारावी पिंजून काढली. मध्यरात्रीच्या सुमारास तपास पथकाला एका आडोशाला साहिल झोपलेला दिसला. वाईट लोकांच्या हाती लागण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत मिरची आणल्यावरून मिळालेला मार आणि ती परत करायला पाठविल्याचा रागात त्याने घर सोडल्याचे समोर आले. पोलिसांनी समजूत काढत त्याला पालकांच्या स्वाधीन केले.