दिवंगत पित्याच्या संपत्तीत सावत्र मुलाला हक्क नाही- उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:26 AM2018-02-11T02:26:43+5:302018-02-11T08:54:30+5:30
मृत्युपत्र न करता मरण पावणा-या हिंदू पुरुषाच्या मालमत्तांचे मरणोत्तर वाटप करताना, त्या व्यक्तीचा सावत्र मुलगा इतर कुटुंबीयांसोबत संपत्तीत वाटा मागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई : मृत्युपत्र न करता मृत्युमुखी पडलेल्या हिंदू पुरुषाच्या मालमत्तांचे मरणोत्तर वाटप करताना, त्या व्यक्तीचा सावत्र मुलगा इतर कुटुंबीयांसोबत संपत्तीत वाटा मागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘हिंदू वारसा हक्क कायद्या’चे कलम ८ आणि त्यानुसार वाटपासाठी कुटुंबीयांची दोन गटांत वर्गवारी करणारे परिशिष्ट याचा अर्थ लावून न्या. एस. सी. गुप्ते यांनी अलीकडेच हा निकाल दिला.
एका दिवंगत हिंदू पुरुषाच्या संपत्तीचे मरणोत्तर वाटप करण्यासाठीचा दावा न्यायालयात गेली १७ वर्षे प्रलंबित आहे. त्या दाव्यातील दोन प्रतिवादींचे निधन झाल्याने त्यांच्या वारसांना प्रतिवादी केले गेले, परंतु त्यांना नोटिसा न बजावल्याने त्यांच्याविरुद्धचा दावा निकाली काढला गेला. त्यानंतर, यापैकी एकाच्या सावत्र मुलाने आपल्यालाही दाव्यात प्रतिवादी केले जावे, यासाठी अर्ज केला. हा अर्जदार मूळ प्रतिवादीचा सावत्र मुलगा (पहिल्या विवाहातून झालेल्या पत्नीचा) होता. थोडक्यात, आपल्या दिवंगत वडिलांच्या वारसाहक्कात आपलाही हक्क आहे, असा त्याचा दावा होता.
हिंदू वारसा हक्क कायद्यात ‘पुत्र’ (मुलगा) या शब्दाची व्याख्या केलेली नसल्याने प्राप्तिकर कायद्याच्या कलम २ (१५बी) मध्ये दिलेली ‘अपत्या’ची व्याख्या येथेही लागू केली जावी, असे या अर्जदाराचे म्हणणे होते.
अर्जदाराचा हा दावा सर्वस्वी असमर्थनीय आहे, असे नमूद करून न्या. गुप्ते यांनी म्हटले की, मृत्युपत्र न करता मरण पावणाºया हिंदू पुरुषाचे, त्याच्या वारसांमध्ये कसे व किती प्रमाणात वाटप करावे, याची तरतूद हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम ८ मध्ये आहे.
अशा वाटपासाठी जे कुटुंबीय पात्र ठरतात, त्यांची दोन गटांमधील वर्गवारी परिशिष्टात दिलेली आहे. या परिशिष्टात नमूद केलेल्या नातेवाइकांमध्ये ‘मुलगा’ आहे, पण ‘सावत्र मुलगा’ नाही.
न्यायमूर्तींनी असेही म्हटले की, हिंदू वारसा हक्क कायद्यात ‘पुत्र’ या शब्दाची व्याख्या केलेली नाही, म्हणून प्राप्तिकर कायद्यातील व्याख्येचा आधार घेण्याची काही गरज नाही. हिंदू वरसा हक्क कायदा व प्राप्तिकर कायदा हे दोन्ही केंद्र सरकारने केलेले कायदे असल्याने, एका कायद्यातील व्याख्या दुसºयात वापरली जाऊ शकते, या अर्जदाराच्या म्हणण्यास काही आधार नाही.
उलट अशा संदिग्धतेच्या वेळी ‘जनरल क्लॉजेस अॅक्ट’चा आधार घेण्याची प्रस्थापित पद्धत आहे.
तसे केले असता, असे दिसते की, जनरल क्लॉजेस अॅक्टच्या कलम २(५७) मध्ये ‘पुत्र’ या शब्दाच्या व्याख्येत दत्तकपुत्राचा अंतर्भाव केलेला आहे, परंतु सावत्र मुलाचा नाही.
रक्ताचे नाते आवश्यक
न्यायालयाने असेही म्हटले की, सर्वसाधारणपणे विवाहसंबंधातून जन्मणारा मुलगा म्हणजे ‘पुत्र’ असे मानले जाते. यात पिता-पुत्र यांच्यातील रक्ताचे नाते हा मुख्य निकष आहे. पत्नीला आधीच्या विवाहातून झालेल्या मुलाला जगरहाटीने ‘सावत्र मुलगा’ म्हटले जात असले, तरी त्याचे नाते रक्ताचे नसते. हिंदूंमध्ये दत्तकविधान संमत असल्याने हिंदू वारसा हक्काच्या संदर्भात ‘मुलगा’ म्हणजे दत्तक घेतलेला मुलगाही असू शकतो, परंतु रक्ताचे कोणतेही नाते नसलेला सावत्र मुलगा या कायद्यानुसार वारसाहक्क सांगू शकणारा ‘मुलगा’ ठरू शकत नाही.