वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:05 AM2021-01-01T04:05:57+5:302021-01-01T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भाताच्या झोडणीचे काम करण्यास सांगितल्याच्या रागातून वाद होऊन मुलाने वडिलांची कोयत्याने हत्या केली. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भाताच्या झोडणीचे काम करण्यास सांगितल्याच्या रागातून वाद होऊन मुलाने वडिलांची कोयत्याने हत्या केली. या प्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी गुरुवारी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुरेश धर्मा धिंडा (वय ५३) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पेंढरीपाडा - ब्राह्मणगाव येथे १७ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.
धर्मा शंकर धिंडा असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. झोडणीचे काम करण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सुरेशने घरातील कोयत्याने वडिलांवर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सुरेश फरार झाला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्याला वसईमधील पाली गावातील एका मासेमारी बोटीवरून अटक केली. या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी राजीव पाटील आणि त्यांच्या पथकाने सुरेशला अटक केली होती. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास उत्तम केल्याने तत्कालीन कोकण विभागीय पोलीस महानिरीक्षक किशोर नवल बजाज यांनी पारितोषिक प्रदान करून गौरव केला होता.
गुरुवारी दुपारी हत्येप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन सुरेश याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून मती मोहळकर यांनी युक्तिवाद केला, तर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी पाटील व त्यांच्या पथकाने वेळोवेळी सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.