Join us  

नाल्यांवर पालिकेची नजर

By admin | Published: April 02, 2017 12:08 AM

नालेसफाईचा घोटाळा गेल्या वर्षी गाजल्यामुळे या कामाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच मोठ्या नाल्यांच्या

मुंबई : नालेसफाईचा घोटाळा गेल्या वर्षी गाजल्यामुळे या कामाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरू झाले आहे. मात्र, नाल्यांमध्ये कचरा टाकणारे स्थानिक रहिवासी या मोहिमेलाच हरताळ फासत असतात. अशा रहिवाशांना नाल्यात कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश आयुक्तांनी आज दिले.मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई आजपासून सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के गाळ नाल्यांमधून काढण्यात येणार आहे. मात्र, अनेक वेळा स्थानिक रहिवासी नाल्यांचा वापर कचराकुंडीसारखा करीत असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे नाले साफ केल्यानंतरही पुन्हा तुंबत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विभाग स्तरावर तयार करण्यात आलेल्या यादीत असे १२५ नाले आढळून आले आहेत. या नाल्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाल्यांमध्ये कचरा टाकण्यात येणाऱ्या परिसरात ‘नाल्यात कचरा टाकू नये’ असे जनजागृतीपर फलक लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नालेसफाई सुरू होण्यापूर्वी त्याची छायाचित्रे व नाल्यांमधील गाळ काढल्यानंतरची छायाचित्रे त्या परिसरात लावावीत, अशा सूचना आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीतून आज केली. (प्रतिनिधी)