लहानपणी सर्पदंश झाला अन् त्यानं तब्बल ४ हजार सर्प पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:06 PM2019-07-28T13:06:22+5:302019-07-28T13:16:15+5:30

वयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले जळगावचे सुपुत्र मुरलीधर जाधव यांनी गेल्या एका तपामध्ये पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले.

As a child snake became a snake and it caught around 3,000 snakes | लहानपणी सर्पदंश झाला अन् त्यानं तब्बल ४ हजार सर्प पकडले

लहानपणी सर्पदंश झाला अन् त्यानं तब्बल ४ हजार सर्प पकडले

googlenewsNext

मनीषा म्हात्रे

मुंबई : वयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले जळगावचे सुपुत्र मुरलीधर जाधव यांनी गेल्या एका तपामध्ये पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले. त्यांच्या या आतापर्यंतच्या प्रवासाला मुंबई पोलीस आयुक़्त संजय बर्वे यांच्याकडून गौरविण्यात आले. गेल्या वर्षी जर्मन देशानेही त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवली होती. सध्या ते पोलीस शिपाई म्हणून कुर्ला पोलीस ठाणे येथे नियुक्तीस असून, मध्य नियंत्रण कक्ष येथे प्रतिनियुक्तीस आहेत. विशेष म्हणजे या कामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची 'मानद वन्यजीव रक्षक अधिकारी' म्हणून नियुक्ती केली आहे. नुकताच जळगावमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘खांदेश रत्न २०१९’ चा पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. सर्पाबाबत असलेली अंधश्रद्धा त्यात स्वयंघोषित सर्प मित्रांमुळे नागरिकांची लूट होत असल्याचे जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्या या प्रवासाबाबत केलेली ही बातचीत...

सर्प पकडण्याची आवड कशी निर्माण झाली ?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लाहोरा या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतात कामासाठी जात होतो. वयाच्या आठव्या वर्षी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. सर्पदंशाचा उपचारासाठी कुटुंबीयांनी अंधश्रद्धेतून गावातील मांत्रिकाकडे धाव घेतली. मांत्रिकाच्या भोंदूगिरीने फरक न पडल्याने तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तोपर्यंत शरीरभर विषाचा प्रभाव पसरला होता. डाॅक्टरांनीही आशा सोडली. अशात चाळीसगावचे सर्पमित्र राजेश ठोंबरे धावून आले. ठोंबरे यांनी जळगावहून विषविरोधी औषध मागवून प्राण वाचविले. या घटनेमुळे माझा पुनर्जन्म झाला. आणि तेव्हापासूनच सापांबाबत विचार करायला लागलो. ठोंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. जागृतीच्या अभावामुळे साप चावलेल्या व्यक्तीला कुठलेही उपचार ‌मिळत नसल्याने त्यासाठी काम करण्याचा चंग बांधला. आणि १३व्या वर्षांपासून साप पकडून त्याची मुक्तता करण्याचे, तसेच वनविभागाच्या मदतीने त्याला जंगलात सोडून देण्याच्या कामाला सुरुवात केली. 
......
घरच्यांचे सहकार्य कसे आहे ?
सुरुवातीला आई-वडिलांनी विरोध केला. मुलगा साप पकडत फिरतो. उद्या त्याला तोच सर्प मारेन अशा अंधश्रद्धेतून नानाविध चर्चा सुरू असताना त्याच काळात सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या मोठा भाऊ राजेंद्र यांनी कुटुंबीयांची समजूत काढली. त्यानंतर घरच्यांनी पाठिंबा दिला. पुढे जोडीदारची निवड करतानाही ज्या मुलीला सर्पाबाबत माहिती असेन आशाच मुलीसोबत लग्न करण्याची अट घातली होती. त्यातूनच शेतकरी कुटुंबातील दहावी शिकलेल्या मुलीशी लग्न केले. रात्री-अपरात्री सर्पाबाबत फोन येताच मी तसाच बाहेर पडतो. ती नेहमीच मला सहकार्य करते. फक्त सांभाळून या असे तिचे म्हणणे असते.
.....


पोलीस दलात कसे आलात?
मला खर तर वनविभागात जायचे होते. अपघाताने घरच्याच्या आग्रहाखातर मी, काकाचा मुलगा आणि गावातून ५४ जणांनी पोलीस भरतीत उडी घेतली. त्यात निवड होताच २००७मध्ये  पोलीस हवालदार म्हणून रुजू झालो. नागपूरमध्ये प्रशिक्षणादरम्यानही सर्प पकडले. तेथून मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक झाली. सहकाऱ्यांना सर्पप्रेमाबद्दल माहिती असल्याने  सर्पाबाबत कॉल येताच मला स्पॉटवर पाठविण्यात येत असे. मला पोलीस दलात राहून नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वन्यजिवांचेही संरक्षण करण्याची संधी मिळते याचे समाधान आणि अभिमान वाटते.
......
नागरिक जेव्हा समोरुन फ़ोन करून सांगतात तेव्हा कसे वाटते? 
 स्टेशनमध्ये पोलिसांच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर सातत्याने सापांबाबत कॉल येतात. एखाद्या वस्तीमध्ये अथवा घरात साप आढळल्यानंतर धास्तावलेले नागरिक पोलिसांना फोन करत, त्यावेळी हे कॉल घ्यायला सुरुवात केली. पोलीस  नियंत्रण कक्षाबरोबरच पालिका, अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षातही माझा क्रमांक दिलेला आहे.  एखाद्या वस्तीत, सोसायट्या किंवा फ्लॅटमध्ये साप असल्यास रहिवाशांची भंबेरी उडते, अशावेळी सर्पमित्रांचा संपर्क नसल्यास नागरिक पोलिसांनाच फोन करतात,  अशावेळी आम्ही घटनास्थळी धाव घेतो. तेव्हा नागरिकाचा प्रतिसाद खूप चांगला असतो. मी नेहमी अशा ठिकाणी जात त्यांना सापांबाबत मार्गदर्शन करतो. आतापर्यंत मुंबई परिसरात अजगर, कोब्रा, व्हायपर (घोणस) मण्यार, हरणटोळ, धामण, कवड्या या सापांना पकडून वन्यजिवांच्या स्वाधीन केले. त्यात आतापर्यन्तच्या अनुभवातून मुंबईतल्या कुठल्या परीसरातून काँल आल्यानंतर तो सर्प क़ुठल्या प्रजातीचा आहे हे समजते. 
.....
एखादा बिकट प्रसंग...
 शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असताना  वरळीच्या 'लीली कॉटेज' परिसरातील एका गल्लीत नागीण शिरली होती. त्यावेळी गल्लीच्या एका टोकाला शाळकरी मुले अडकून राहिल्याचा कॉल नियंत्रण कक्षावर खणाणला. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेता नागिणीला हातानेच पकडावे लागणार होते. यावेली हिंमतीने नागिणीच्या फण्यावर हात ठेवून तिला पकडले आणि मुलांची त्या कठीण प्रसंगामधून सुटका केली. त्यात अंधेरीतही ट्रकख़ाली अजगर असल्याचा फ़ोन आला. तेथेही गाड़ीवर आदीवासी मुले असल्याने अंधश्रध्देतून सर्पाला मारू नये म्हणून मी तेथे धाव घेतली. पहाटेपर्यंत गाडीतले सामान उतरवून सर्पाची सुटका केली. 
.....
हौशी सर्पमित्रांबाबत काय वाटते ?
सध्या काही संस्था खरच खूप चांगले काम करताहेत. पण काही हौशी स्वयंघोषित सर्पमित्र पैशासाठी याकडे वलत असल्याचे दिसून येते. त्यांना कॉल येताच अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. एकप्रकारे ही लूट आहे. हे चुकीचे आहे. त्यातही फक्त फोटो, व्हिडीओला प्राधान्य असते. जे जीवावर बेतू शकते. त्यासाठी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे.
....
सर्प दिसल्यास काय करावे ?
घरात सर्प दिसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये शक़्य तेवढे त्याच्यापासून लांब रहा. सर्पमित्र किंवा पोलिसांना याबाबत कलवावे. सापाला कधीही मारण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही अनेकदा फोन वरून त्यांना समजावत असतोच.

....
खान्देश रत्न २०१९’ चा पुरस्काराबाबत काय सांगाल..
शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला असताना २०१४ मध्ये वांद्रे-कलानगर येथील 'मातोश्री' बंगल्याच्या शेजारील बंगल्यात  अजगर शिरला होता. त्याला बाहेर काढण्याची जोखीम मी उचलली आणि त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेनंतर मी पहिल्यादा प्रकाशझोतात आलो. त्यानंतर वेलोवेली वरिष्ठाक़डुन कौतुकाची थाप पाठीवर पडत गेल्याने आत्मविश्वास वाढला. खांदेश रत्न २०१९’ पुरस्कार मिळत असल्याने खूप आनंद होत आहे. 
....
पुढील ध्येय काय आहे ?
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सर्पाबाबत जनजाग्रुती करायची आहे. सध्या वरिष्ठांच्या आदेशाने मुंबईतील शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. भविष्यात हा उपक्रम वाढवायचा आहे. आजही आदिवासी पाड्यात, खेड्यांमध्ये सर्पाबाबत अंधश्रद्धा आहे. 
 

Web Title: As a child snake became a snake and it caught around 3,000 snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.