२० वर्षांपासून मूल होत नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरून बाळाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:33 AM2018-11-07T04:33:17+5:302018-11-07T04:33:49+5:30
लग्न होऊन २० वर्षे उलटली. मात्र, मूल होत नसल्याने रेल्वे स्थानकातून २ वर्षांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मुंबई - लग्न होऊन २० वर्षे उलटली. मात्र, मूल होत नसल्याने रेल्वे स्थानकातून २ वर्षांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पार्वती देवी विश्वकर्मा असे या महिला आरोपीचे नाव आहे. ऐन दिवाळीत बाळ चोरी झाल्याने शोकात बुडालेल्या आईला अवघ्या २४ तासांत बाळ सुखरूपपणे सोपविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. यामुळे पोलिसांनी ‘आईला’ दिलेली दिवाळी भेट नागरिकांमध्ये चर्चेस पात्र ठरत आहे.
दिवाळीनिमित्त औरंगाबाद येथील चापाले या मूळ गावी जाण्यासाठी दिवा येथे राहणाºया विमल सातदिवे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये रविवारी पोहोचल्या. या वेळी विमल यांच्यासह २ वर्षांचा मुलगा सनीदेखील होता. पतीची वाट पाहात असताना सीएसएमटीच्या हॉलमध्ये झोपल्या. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली असता, सनी नसल्यामुळे सीएसएमटी येथे शोधाशोध सुरू केली. अखेर सनी दिसत नसल्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.
तपासादरम्यान महिला सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून नालासोपाराकडे गेल्याची माहिती मिळाली. नालासोपरा येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमवारी १ वाजण्याच्या सुमारास महिला बाळाला घेऊन जात, विरार फलाट क्रमांक १ वरून पूर्वेला बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी स्थानकाबाहेर याबाबत तपास केला असता, प्रवाशांनी एका रिक्षा चालकाने महिला आणि दोन वर्षांच्या बाळाला विरार येथील तुळींज परिसरात सोडल्याचे सांगितले.
तुळींज परिसरात आरोपी महिलेच्या घरात २ वर्षीय मुलगा सापडल्याने आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या. मूल होत नसल्यामुळे घरात नेहमी वाद होत होते. शनिवारी रात्रीदेखील अशाच पद्धतीने वाद झाले. याचा राग डोक्यात ठेऊन महिला सीएसएमटी येथे आली. येथून २ वर्षांच्या बाळाला नकळत उचलून आणल्याची कबुली आरोपी पार्वतीदेवी विश्वकर्माने दिली.
अवघ्या २४ तासांत आई आणि चोरी झालेल्या बाळाची भेट करून देण्यासाठी सीएसएमटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि पथकासह रेल्वे पोलीस गुन्हे शाखा, रेल्वे सुरक्षा बल यांनी चोख कामगिरी बजावली. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला असून, याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणपत गोंदके करत आहेत.
- पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ, रेल्वे पोलीस.