लहान मुलांची तस्करी हा घृणास्पद प्रकार, उच्च न्यायालयाने अपहरणकर्त्याचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:52 AM2023-03-21T06:52:47+5:302023-03-21T06:53:47+5:30
१० महिन्यांची मुलगी तिच्या आईबरोबर फुटपाथवर झोपलेली असताना आरोपीने तिचे अपहरण केले.
मुंबई : लहान मुलांची तस्करी हा शोषणाचा एक अत्यंत गंभीर आणि घृणास्पद प्रकार आहे, ज्याचा परिणाम केवळ बालक आणि
त्याच्या कुटुंबावरच होत नाही, तर समाजाच्या जडणघडणीलाही धोका निर्माण होतो, असे म्हणत उच्च न्यायालयाने १० महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जामीन नाकारला.
१० महिन्यांची मुलगी तिच्या आईबरोबर फुटपाथवर झोपलेली असताना आरोपीने तिचे अपहरण केले. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी परंदम गुडेंटी याने तेलंगणातील एका निपुत्रिक दाम्पत्याला एक लाख रुपयांना बाळाची विक्री केली होती. फुटपाथवर राहणारे, विशेषतः रस्त्यावरील मुले, समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित वर्ग आहेत, जे अत्याचार आणि शोषणाला बळी पडतात, असे न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने म्हटले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला जामीन देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. गुडेंटीवर गुन्हेगारी कट रचणे, अपहरण करणे, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे आणि तस्करीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी, पोलिसांनी सादर केलेले पुरावे असे दर्शवतात की, गुडेंटी मुलांचे अपहरण आणि विक्रीच्या रॅकेटमध्ये सामील होता, असे न्यायालयाने म्हटले.