Join us

उघड्या वायरने घेतला चिमुकलीचा बळी; दोन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 12:42 PM

या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध  निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, शनिवारी गुन्हा नोंदविला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वाकोला येथे पथदिव्यांच्या पोलसाठीच्या वायर उघड्या राहिल्याने, त्या लोखंडी वस्तूला धडकून त्याच भागात खेळत असलेल्या तीन मुलांना शुक्रवारी रात्री शॉक लागला. यामध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध  निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, शनिवारी गुन्हा नोंदविला आहे. 

सांताक्रुझ पूर्वेकडील चैतन्य १ कॉलनी, इमारत क्रमांक ४ स्नेहा बिल्डिंग येथे ४ वर्षांच्या मुलीला शॉक लागल्याची माहिती मिळताच, वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शहरीन परवीन मोहम्मद इप्तकार शेख ही गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तिच्याआधी आणखीन दोन मुलांना रिक्षातून व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेल्याचे समजले. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेताच, रात्री अकराच्या सुमारास शहरीन हिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर तनिष्क प्रवीण शिंदे (५) आणि वैष्णवी दशरथ माळवे (९) दोघेही जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.  दोघेही डवरीनगर नंबर २ येथील रहिवासी आहे. शहरिन ही डवरीनगर येथील रहिवासी होती.

गुन्हा दखल

संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सध्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले.

पथदिव्यांच्या खांबाच्या वायरसोबत छेडछाड 

कोणीतरी पथदिव्यांच्या खांबाच्या वायरसोबत छेडछाड केल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे. तपासाला आमच्याकडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीने दिली.

 

टॅग्स :मुंबई