सतर्क मातेमुळे फसले बालिकेचे अपहरण
By Admin | Published: May 8, 2017 04:00 AM2017-05-08T04:00:06+5:302017-05-08T04:00:06+5:30
वडिलांना डुलकी लागली अन् आई लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधत धावत्या रेल्वेतून पावणेचार वर्षांच्या चिमुकलीचे एका महिलेने
ंलोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वडिलांना डुलकी लागली अन् आई लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधत धावत्या रेल्वेतून पावणेचार वर्षांच्या चिमुकलीचे एका महिलेने अपहरण केले; परंतु पुढचे स्टेशन येण्यापूर्वीच आई-वडिलांनी पूर्ण गाडी पालथी घालून आपल्या पोटच्या गोळ्यास एका महिलेच्या ताब्यातून हिसकावून घेतले. ही घटना रविवारी सकाळी तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडली. रेल्वे पोलिसांनी अपहरणकर्त्या महिलेस अटक केली. भीक मागण्यासाठी त्या महिलेने चिमुकलीला पळवल्याचे समोर आले.
ईश्वरी रामेश्वर केंद्रे (रा. बदलापूर, जि. ठाणे) असे चिमुकलीचे नाव आहे. तर अनामिका सुरेशराव मांझी (रा.कस्बा देहेरी, जि. अंसूल, झारखंड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. एका विवाहसोहळ््यासाठी रामेश्वर केंद्रे हे पत्नी मुक्ता, मुलगी ईश्वरी आणि मुलगा रुद्र (२) यांच्यासह तपोवन एक्स्प्रेसने परभणीला जात होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गाडी मनमाड स्थानकातून औरंगाबादच्या दिशेने निघाली. तेव्हा रामेश्वर यांना डुलकी लागली. ईश्वरीला लघुशंका आल्याने आई तिला आणि रुद्रला घेऊन टॉयलेटकडे गेली. याचवेळी एका टॉयलेटमधून अनामिका बाहेर पडली आणि तेथेच घुटमळत राहिली. टॉयलेटमध्ये प्रथम ईश्वरी जाऊन आली व बाहेर थांबली. त्यानंतर रुद्रला लघुशंकेसाठी घेऊन मुक्ता आत गेल्या. बाहेर आल्यानंतर त्यांना ईश्वरी दिसली नाही. त्या धावतच पतीकडे गेल्या आणि त्यांना झोपेतून उठवले. रामेश्वर आणि मुक्ता यांनी धावत्या रेल्वेत ईश्वरीचा शोध सुरू केला असता एका प्रवाशाने एक महिला चादरीत गुंडाळून एका मुलीस घेऊन गेल्याचे सांगितले.
ईश्वरीला गोधडीत गुंडाळून चौथ्या डब्यातून दहाव्या डब्यात नेले. शोध घेत केंद्रे दाम्पत्य दहाव्या डब्यात पोहोचले तेव्हा तेथे त्यांना अनामिकाजवळ ईश्वरी दिसली. मुक्ता आणि रामेश्वर यांनी तिच्याकडून ईश्वरीला हिसकावून घेतले. त्यानंतर सहप्रवाशांनी अनामिकाला पोलिसांच्या हवाली केले.