मुंबई : आजचे विद्यार्थी हे टेकसॅव्ही असून प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्यांना संगणकाचेही उत्तम ज्ञान असते. या पार्श्वभूमीवर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणारा अभ्यासाचा कंटेन्ट हादेखील त्यांच्या हाताशीच असला, तर तो त्यांना कधीही अभ्यासता येऊ शकतो. याच संकल्पनेवर बालभारतीकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइलवर ‘ई बालभारती’ नावाचे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीच्या पुस्तकातील धडे आणि स्वाध्याय आता या अॅपमुळे मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. बालभारतीकडून या उपक्रमाची सुरुवात ऑगस्टमध्येच करण्यात आली असून, सध्या प्रायोगिक तत्त्वावर आणि इंग्रजी माध्यमाचे सुरुवातीचे २ ते ३ धडे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयांचे सुरुवातीचे २ ते ३ धडे बीटा व्हर्जन स्वरूपात विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १ जानेवारीपर्यंत उर्दू माध्यमासह सर्व विषयांचे धडे हे स्वाध्यायासह उपलब्ध करून देण्याचा ई बालभारतीचा मानस असल्याची माहिती ई बालभारती विभागाचे प्रभारी संचालक योगेश लिमये यांनी दिली. प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम पूर्णत: अस्तित्वात आणल्यानंतर विद्यार्थ्यांकडून नाममात्र २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या टॅब, मोबाइलमधील हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड, अॅपल व्हर्जनवर किंवा डेस्कटॉपवरसुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये जागेची कमतरता असल्यास विद्यार्थी एक एक धडा/कविता त्यांचे स्वाध्याय डाउनलोड करून, त्याचा अभ्यास करू शकतील. त्यासाठी त्यांना पूर्ण पुस्तक एकदाच डाउनलोड करण्याची गरज नाही. गणित, विज्ञान अशा विषयांसाठी विशेष मेहनत घेण्यात आली असून, त्यासाठी वेगळे प्रोग्रामिंग करून विद्यार्थ्यांना डायनॅमिक सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती लिमये यांनी दिली.
३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा प्रस्तावित आहेत, त्या आधी तिन्ही माध्यमांमध्ये सर्व धड्यांसाठी असे स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येतील, ज्यामुळे स्वअध्ययनासाठी विद्यार्थ्यांना बाहेर कुठल्याही सामग्रीची गरज भासणार नाही, अशी माहिती लिमये यांनी दिली. या उपक्रमाचा आतापर्यंत ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.