बालसाहित्याला विज्ञानाची ओढ
By Admin | Published: November 14, 2016 04:43 AM2016-11-14T04:43:12+5:302016-11-14T04:43:12+5:30
‘चल रे भोपळया टुणुकटुणूक...’ म्हातारी आणि भोपळ््याची ही गोष्ट लहानपणी कित्येकांनी ऐकली असेल, पण आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच
मुंबई: ‘चल रे भोपळया टुणुकटुणूक...’ म्हातारी आणि भोपळ््याची ही गोष्ट लहानपणी कित्येकांनी ऐकली असेल, पण आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लहानग्यांना ‘म्हातारी आणि भोपळा’ कथेमागचा आनंद माहीत असेल. काळ बदलतोय तसे साहित्यही बदलत आहे. बालसाहित्यसुद्धा यात मागे नाही. वैज्ञानिकतेने झपाटलेल्या सध्याच्या युगातील बालकथांमधील कल्पनेतील परी, राजा-राणींचे विश्व मागे पडत असून, विज्ञानाची ओढ बालसाहित्यातून डोकावताना दिसत आहे. बाल दिनाचे औचित्य साधत, अशाच काहीशा बदलत्या बालसाहित्याचा ‘लोकमत’ने या निमित्ताने घेतलेला खास आढावा वाचकांसाठी...
बदलत्या युगानुसार बालदिनाचा ट्रेंड बदलला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना या साऱ्या गोष्टी बोअर वाटायला लागल्या आहेत. काहीतरी अॅडव्हेंचर्स प्लानिंग करून, त्यांना हा दिवस घालवायचा असतो. त्यामुळे पालकही मुलांना मॉलमध्ये घेऊन जाऊन त्यांना आवडेल अशा गोष्टी करतात आणि हा दिवस साजरा करतात.
मुलांमधील हा बदल आता बालसाहित्यिकांनीदेखील टिपला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बालसाहित्य कात टाकत आहे. परीकथेतील परी, राजा-राणी, पंचतंत्रातील प्राणी हल्लीच्या मुलांच्या पसंतीस उतरत नाहीत. त्यामुळेच हल्लीची लहान मुले टॅब हातात घेऊन, गुगल सर्च करणाऱ्यास पसंती देतात किंवा प्ले स्टोअरमधून गेम डाउनलोड करून तासन्तास गेम खेळत बसतात. मुलांना वाचनाकडे पुन्हा वळविण्यासाठी साहित्यिकांनीही कंबर कसली आहे. बालसाहित्यिकांनी बालविश्वाचा पसारा वाढवत, मुलांना आवडणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे. विज्ञान, नवे शोध, भविष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या चिमुकल्यांसाठी बालसाहित्य लिहिले जात आहे, पण या बालसाहित्याला मुलांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम पालकांना करायचे आहे. मुलांच्या हाती केवळ टॅब देण्यापेक्षा, त्यांच्या विचारांना चालना देणाऱ्या साहित्याचे वाचन त्यांनी या मुलांसोबत केले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने बालदिन साजरा होईल, असे साहित्यिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)