बाल्यावस्थेतील कर्करोग - अडचणी आणि आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:07 AM2021-02-13T04:07:26+5:302021-02-13T04:07:26+5:30
- डॉ. अंजली पाटील - डॉ. सुजाता वसानी एखाद्या मुलास कर्करोग असल्यास, पालकांना बरेच प्रश्न असणे स्वाभाविक आहे, जसे ...
- डॉ. अंजली पाटील
- डॉ. सुजाता वसानी
एखाद्या मुलास कर्करोग असल्यास, पालकांना बरेच प्रश्न असणे स्वाभाविक आहे, जसे की, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? माझ्या मुलाची तब्येत ठीक होईल? या सर्वांचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल? सर्व प्रश्नांची उत्तरे नसतात; परंतु या रोगाबद्दल जागरूकता निश्चितपणे मदत करेल.
...................
कर्करोगाचे निदान होणे, ही बातमी कोणत्याही वयात वाईट असते; परंतु मुलांमध्ये निदान झाल्यास ते विशेषतः वाईट असते. जरी मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दुर्मीळ असले तरी ते मुलांमध्ये मृत्यूचे महत्त्वपूर्ण कारण आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे ३ लाख मुलांना कर्करोगाचे निदान होते (भारतात दरवर्षी सुमारे ५०,००० रुग्ण आढळतात.)
विशिष्ट प्रकारचे कर्करोग विशेषतः मुलांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ- ल्युकेमिया, ब्रेन ट्यूमर, लिम्फोमा आणि सॉलिड ट्यूमर. उदाहरणार्थ- न्यूरोब्लास्टोमा, सारकोमा, विल्यम्स ट्यूमर (मूत्रपिंडाचा कर्करोग) इ. इतर कर्करोग जसे की, जर्म-सेल ट्यूमर, थायरॉइड ट्यूमर आणि मेलेनोमाही १५ ते १९ वयोगटात आढळतात. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे बाल्यावस्थेतील कर्करोग. या कर्करोगाचे नेमके कारण सांगता येत नाही. सुमारे ५ टक्के कर्करोग हे आनुवंशिक प्रवृत्तीमुळे असू शकतात. म्हणूनच जर एखाद्या मुलाला आनुवंशिक रेटिनोब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग) असेल, तर त्याच्या भावंडांना नियमितपणे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सल्ला दिला जाऊ शकतो. बाल्यावस्थेेतील कर्करोग हे व्हायरस, रसायने (कीटकनाशक, बोरॉन, पेट्रोलियम उत्पादने इ.), किरणोत्सर्ग किंवा पुन्हा- पुन्हा केलेले सीटी-स्कॅन यामुळेही होऊ शकतात.
उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, कर्करोग बरा करण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. तथापि, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये कर्करोग बरा करण्याचे प्रमाण २० टक्के इतके कमी असू शकते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये कर्करोग बरा होण्याचे प्रमाण कमी असते. कारण योग्य निदान केले जात नाही किंवा उशिरा निदान होते किंवा योग्य उपचार मिळू शकत नाही. कधी- कधी उपचार पूर्ण होण्यापूर्वीच सोडून दिले जातात. अनेकदा आवश्यक औषधे आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसते. कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाणही जास्त असते आणि रिलेप्समुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही जास्त असते. सामान्यत: बाल्यावस्थेतील कर्करोगाचा प्रतिबंध शक्य नसल्यामुळे, सर्वोत्तम रणनीती आहे, त्वरित आणि अचूक निदान करणे आणि त्यानंतर प्रभावी थेरपीद्वारे उपचार करणे.
मुलामध्ये कर्करोग होण्याची शक्यता दर्शविणारी काही लक्षणे म्हणजे ताप, रात्री झोपेत खूप घाम येणे, रक्तपेशींचे असामान्य प्रमाण होणे, कमी हिमोग्लोबिनमुळे अशक्तपणा आणि थकवा येणे. अनेकदा हे ल्युकेमियाचे प्रथम चिन्ह असू शकते, पेटेचिया (त्वचेवर लाल रंगाचे अनेक पिन-पॉइंट लहान स्पॉटस्/डाग) आणि रक्तस्राव (जे मूत्रात किंवा शरीराच्या आत असू शकते). बऱ्याच गाठी किंवा वाढलेले नोडस् (मानेमध्ये किंवा विशेषत: छातीत), हाडे आणि सांधेदुखी किंवा वजन कमी होणे, हीसुद्धा कर्करोगाची काही लक्षणे आहेत. अशावेळी मुलास शक्य तितक्या लवकर कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक असते.
योग्य निदानासाठी रक्त तपासणी, बायोप्सी, सीटी स्कॅन, एमआरआय, पीईटी स्कॅन, अस्थिमज्जा चाचणी इत्यादींसह संबंधित तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टर कर्करोगशल्यविशारद), बालरोगशल्यविशारद, वैद्यकीय कर्करोग विशेषज्ञ किंवा रक्तविज्ञानी यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशनथेरपी, हार्मोनलथेरपी, स्टेम सेल प्रत्यारोपण किंवा इम्युनोथेरपीची आवश्यकता असू शकते. मुलाला वारंवार रक्त उत्पादनांचा वापर करावा लागू शकतो. उपचारांना ३ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतात. तथापि, योग्य उपचार दिल्यानंतर, मुलांमध्ये बहुतेक उपचारांचा निकाल उत्कृष्ट असतो (प्रौढांमधील कर्करोगात उपचारांचे परिणाम बाल्यावस्थेतील कर्करोगासारखे तितके चांगले नसतात).
ज्या मुलांनी उपचार पूर्ण झाले आहेत, त्यांना कर्करोगाची पुनरावृत्ती आहे का नाही, हे पाहण्यासाठी नियमित तपासणीची आवश्यकता असते आणि पाठपुरावा नेहमीच न चुकता केला पाहिजे. जेव्हा कर्करोग बरा होतो आणि जेव्हा उपचार थांबतात, तेव्हा पूर्णपणे नवीन लढाई सुरू होते. उपचारांमुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात आणि हे आयुष्यात नंतर उद्भवू शकतात आणि त्यांच्यासाठी विविध तपासण्या करणे महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह बालपणात किंवा नंतरच्या आयुष्यातदेखील दिसू शकतात. मुलांना, न्यूरो-कॉग्निटिव्ह डिसफंक्शनमुळे (जसे की स्मृतीत अडचण येणे, व्हिज्यु-स्पेसियल कौशल्ये कमी असणे, अभ्यासाकडे लक्ष कमी असणे.) शाळेत कमी गुण मिळू शकतात. त्यांना शारीरिक अपंगत्व येऊ शकते किंवा स्तब्ध वाढ होऊ शकते. उशिरा होणारी हृदयाचे आणि फुप्फुसांचे आजार तसेच प्रौढ वयात कर्करोगाची शक्यता वाढते (उदाहरणार्थ, स्तन कर्करोग).
कधी- कधी कर्करोग बरा करणे शक्य नसते. या मुलांची रोगसूचक/ पॅलिएटिव्ह काळजी घेणे आवश्यक असते. टर्मिनल कर्करोगाच्या रुग्णांना वेदना कमी करणे महत्त्वाचे असते. कर्करोगामुळे होणाऱ्या वेदनांना योग्य आणि तातडीने आराम देणाऱ्या उपचारांची आवश्यकता असते आणि त्यासाठी मॉर्फिनसारख्या वेदना कमी करणाऱ्या औषधांची उपलब्धता करणे आवश्यक असते, तसेच रुग्णांचे आणि कुटुंबाचेही जीवनमान चांगले करणे महत्त्वाचे असते.
बाल्यावस्थेतील कर्करोगांमध्ये जागरूकता आणि लवकर निदान करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे जगण्याची क्षमता सुधारते. यामुळे कमी त्रास सहन करावा लागतो, कमी खर्चिक उपचारांचा वापर केला जातो आणि बहुतेक वेळा आणि बऱ्याचदा कमी-तीव्र उपचारांचीही आवश्यकता असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह मनोवैज्ञानिक, नर्सिंग आणि सहायक काळजी घेणे आवश्यक आहे.
बालपण कर्करोगाचा उपचार हा सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या सेटिंगमध्ये प्रभावी आणि यशस्वी ठरू शकतो, जर तेथे जागरूकता असेल आणि योग्य वैद्यकीय सेवेची उपलब्धता असेल तर. कधी- कधी एखाद्या पालकाला, आजारी मुलाची काळजी घेण्यासाठी, काम करणे थांबविणे आवश्यक होऊन जाते. यामुळे पालकांवर आर्थिक, सामाजिक आणि भावनिक ताण पडतो. संशोधन, सामाजिक समर्थन, तसेच आर्थिक साहाय्य यासाठी दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि या समस्यांना त्वरित सुधारण्याची आवश्यकता आहे.
(अंजली पाटील या कर्करोगशल्यविशारद, तर सुजाता वसानी या वैद्यकीय कर्करोग विशेषज्ञ आहेत.)