Join us

बालपणाचे सुख दुःख कॅनव्हासवर; चित्रकार माधवी जोशी यांचे ' द चाइल्डहूड स्टोरीज' कला प्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: November 21, 2023 9:08 PM

चित्रकार माधवी जोशी यांनी 'द चाइल्डहुड स्टोरीज' या चित्र प्रदर्शनात सध्याच्या काळाशी सुसंगत असे संवेदनशील विषय कॅनव्हासवर मांडले आहेत.

मुंबई - चित्रकार माधवी जोशी यांनी 'द चाइल्डहुड स्टोरीज' या चित्र प्रदर्शनात सध्याच्या काळाशी सुसंगत असे संवेदनशील विषय कॅनव्हासवर मांडले आहेत. या प्रदर्शनात माधवी यांनी जीवनातील, बालपणातील सुख- दुःख चित्रांमधून मांडले आहेत. या विषयाची अदभूत मांडणी, शैलीचा नेमका आणि नाट्यमय वापर यामधून त्यांनी बालपणातील कष्टमय जीवन आणि तरीही साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद नेमकेपणाने कॅनव्हासवर चित्रित केला आहे.

चित्रकर्ती माधवी जोशी यांचे ' द चाईल्डहूड स्टोरीज' हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.

माधवी या प्रामुख्याने चित्रांमधून हिंदू देवदेवतांना कॅनव्हासवर आपल्या शैलीतून मांडतात. ही चित्र मालिका बालपणाशी निगडीत संवेदनशील पण व्यक्त करण्यास कठीण विषय अतिशय तरलपणे, प्रभावीपणे रसिकांसमोर मांडते. बालपणासारख्या संवेदनशील विषयामुळे माधवी यांचे हे प्रदर्शन चित्तवेधक  आहेच, पण त्याचबरोबर रेषा, भौमीतिक आकार, रंग यासारख्या चित्र यशस्वी करणा-या घटकांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये दृश्यात्मक नाट्यमयता आणते. माधवी यांची आत्तापर्यंत २५ पेक्षा जास्त एकल प्रदर्शने झाली आहेत. तर शंभरपेक्षा अधिक समुह प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे. याचबरोबर त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी चित्रे दान केली आहेत.