Join us

मुले एकलकोंडी होणार नाहीत ना, याकडे लक्ष द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

कोरोना, लॉकडाऊन आणि मानसिकता : पालकांनाे, वेळीच काळजी द्या, तज्ज्ञांचा सल्लालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळ हा ...

कोरोना, लॉकडाऊन आणि मानसिकता : पालकांनाे, वेळीच काळजी द्या, तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळ हा प्रत्येकासाठी कसोटीचा आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे घरातच राहावे लागत असल्याने वयस्करांसह, लहान मुलांच्या मनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आणि मित्रांना भेटता येत नसल्याने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत आहे. बरीच लहान मुले आता नैराश्य, चिंता आणि तणाव यासारख्या मानसिक त्रासातून जात आहेत. अशास्थितीत मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राखायचे असेल तर पालकांनी त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल काबरा म्हणाले की, लॉकडाऊनचा विपरीत परिणाम हा मोठ्यांसह लहान मुलांवरही होऊ लागला आहे. शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांना दिवसभर घरातच बसून राहावे लागत असल्याने ती कंटाळली आहेत, एकलकोंडी बनत चालली आहेत. यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता व तणाव वाढीला लागत आहे. मुले हिंसक बनू लागली आहेत. त्यातच आजूबाजूला कोरोनाच्या चर्चा असल्याने मुलांच्या कोवळ्या मनात भीती आहे. मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना या मानसिक आजारातून लवकर बाहेर काढता येऊ शकेल.

* अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

१. मुलांना कोरोना विषाणूची पुरेशी माहिती करून द्या.

२. मुलांनी दिवसभर टीव्हीवर काय पहावे, हे ठरवा.

३. सोशल मीडियाचा मुलांना अतिरिक्त वापर करू देऊ नका.

४. मुलांना घरच्या घरी शैक्षणिक चित्रपट दाखवा, जेणेकरून त्यांचे मनोरंजन होईल.

५. बैठे खेळ खेळू द्या. पुस्तक वाचनाची सवय लावा, व्यायाम करायला सांगा, संगीत ऐकवा.

६. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा.

७. आपल्या मुलाला घरी कंटाळा येऊ नये, यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यस्त ठेवा.

८. चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धुणे, याचे महत्त्व मुलांना पटवून द्या.

.................................................