मुलांनाे, व्हा तयार; ४५ दिवसांच्या कालावधीत हाेणार तीन चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:58 AM2021-06-29T05:58:05+5:302021-06-29T05:58:52+5:30
इयत्ता दुसरी ते दहावी; ‘सेतू’च्या उजळणीने शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले असून, मागील सत्रात ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. तरीही शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ तयार केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या ‘सेतू अभ्यासक्रमा’चे ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात दिली.
सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १ जुलै ते १४ ऑगस्ट या ४५ दिवसांच्या कालावधीत हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून, मराठी आणि उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्रे विषयांसाठी हा उजळणी अभ्यासक्रम असेल. एससीईआरटीने तयार केलेल्या ‘सेतू अभ्यासक्रमा’चे ऑनलाईन उद्घाटन शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी उपस्थित होते.
सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या असून, त्या विद्यार्थीकेंद्रीत, कृतीकेंद्रीत तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. विद्यार्थी याद्वारे स्वयंअध्ययन करू शकतील. तसेच सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आल्या असून, शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ऑफलाईन सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सेतू अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक वंचित घटकांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शिकत राहतील, असे कडू यांनी यावेळी सांगितले.
सेतू अभ्यासक्रम राबविण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोरपणे करावी, अशा सूचना विभागीय शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
जुनी पुस्तके जमा केल्यामुळे उजळणी करण्यात अडचणी!
या उपक्रमांतर्गत जुनी पाठ्यपुस्तके उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांनी ती शाळेत जमा करू नये, अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अनेक शाळा आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्याच्या आधीच्या निर्देशानुसार पुस्तके याआधीच जमा करून घेतलेली आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तके जमा केली आहेत ते पुढील दीड महिना उजळणी कशी करणार? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. शिक्षण विभागाच्या स्वतःच्याच निर्णयात होत असलेल्या अशा गोंधळामुळे शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम आहे.