मोहरम मिरवणुकीत मुलांचा सहभाग नको
By admin | Published: July 4, 2017 07:32 AM2017-07-04T07:32:11+5:302017-07-04T07:32:11+5:30
मोहरमच्या मिरवणुकीत लहान मुलेही सामील होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईच्या अतिरिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोहरमच्या मिरवणुकीत लहान मुलेही सामील होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना मिरवणूक आयोजक व शिया समाजाच्या नेत्यांबरोबर बैठक घेण्याचे निर्देश दिले. लहान मुले या मिरवणुकीत सहभागी होणार नाहीत, याची खात्री करा, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.
मोहरमच्या मिरवणुकीत ‘मातम’ करण्यात येते. मिरवणुकीत सहभागी झालेले आपल्या अंगावर धारदार शस्त्राने वार करतात. याच मिरवणुकीत लहान मुलेही सहभागी असतात. त्यांना यापासून दूर ठेवण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर.एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.
या मिरवणुकीदरम्यान काय काळजी घेण्यात यावी, यासंदर्भात पोलीस विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, संबंधित विभागातील पोलीस अधिकाऱ्याने मोहरमपूर्वी समाज नेत्यांशी व आयोजकांबरोबर एक बैठक घ्यावी. मोहरमच्या मिरवणुकीत मुलांना सहभागी करू नये. कोणतेही धारदार शस्त्र वापरू नये व मिरवणुकीचे चित्रीकरण करण्याच्या आड येऊ नये.
यासंबंधी पुढे काय कार्यवाही करावी, यासाठी दक्षिण मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मोठ्या आयोजकांसह समाज नेत्यांबरोबर बैठक घ्यावी. समाज नेत्यांनीच जर मुलांना मिरवणुकीत सहभागी होऊ दिले नाही तर पोलिसांना लक्ष ठेवण्याची गरजच नाही, असे न्यायालयाने म्हटले.
अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी यासंबंधी २४ जुलै रोजी अहवाल सादर करावा. आम्हाला या याचिकेवरील पुढील सुनावणी मोहरमपूर्वी घ्यायची आहे, असेही न्यायालयाने म्हटले.