Join us

महिला पोलिसांची मुले म्हणे, आता आम्हाला आईसोबत खेळता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:07 AM

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिला पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास ...

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिला पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आई लवकर घरी येणार म्हणून त्यांची मुलेही आनंदी आहेत. ''आता, आईसोबत खेळता येणार'' असल्याचे ते सांगतात.

पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचा भारही खांद्यावर आहे. अशात सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. मानसिक ताणही वाढत आहेत. काही महिला पोलिसांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती. या निर्णयामुळे आता चार तासांची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी मुंबईतील पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेत, १ जानेवारी २०१७ पासून मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांत आठ तासांच्या ड्युट्यांचा निर्णय जाहीर केला होता. वर्षभर याची अंमलबजावणीही झाली. लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद होत काही ठिकाणी १२ तास सेवा २४ तास ड्युटीची पद्धत सुरू केली. अनलॉकच्या काळात पुन्हा काही पोलीस ठाण्यांत ८ तास सेवेला सुरुवात झाली आहे.

मात्र, वरिष्ठांच्या आदेशामुळे सगळीकडेच महिलांना ८ तास ड्युटी मिळणार असल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. अनेक जणी मुलांना पाळणाघर अथवा नातेवाइकांकड़े सोडून कर्तव्य बजावतात. अशात आता आई लवकर घरी येणार म्हटल्याने मुलेही आनंदी आहेत.

....

आता आईसोबत खेळता येणार

आई कामावरून आली की, थकलेली असायची. त्यात काम उरकून झोपण्याची घाई. माझ्यासोबत खेळायला वेळ मिळत नव्हता. ती पुन्हा लवकर घरी येणार आणि मला आईसोबत खेळता येणार आहे.

- महिला अंमलदारची मुलगी

....

आईची धावपळ कमी होईल

आई सकाळी लवकर उठून सगळे काम उरकून कामाला जाते. पुन्हा रात्री उशिराने घरी येते. गणपतीत घरात बाप्पा असतानाही तिला वेळ मिळाला नाही. आता किमान दिवाळी तरी आम्ही एकत्र साजरी करू.

- महिला अंमलदारचा मुलगा

....