मुंबई: प्ले झोनमध्ये खेळताना लहान मुलांच्या झालेल्या भांडणात मानस सुभाष वकील (४०) नामक इसमाने ३८ वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याच्या चार वर्षीय चिमुरड्याच्या श्रीमुखात भडकावल्याचा संतापजनक प्रकार बोरीवलीच्या मोक्ष प्लाझामध्ये घडला. याविरोधात त्यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या मुंबई पोलिसांच्या एस. बी. वन विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या त्यांचे पती तसेच ४ वर्षांच्या मुलासोबत बोरीवली पश्चिमच्या योगी नगरमध्ये असलेल्या पोलिस अधिकारी वसाहतीत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता मुलाला घेऊन मोक्ष प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या हम्प्टीजम्प्टी प्लेझोनमध्ये त्या पतीसोबत गेल्या होत्या. त्यांचा मुलगा अन्य लहान मुलासोबत खेळत असताना खेळणी हाताळण्याच्या कारणावरून खेळाच्या नादात एका लहान मुलीचे तक्रारदाराच्या मुलासोबत भांडण झाले. त्यावेळी त्या मुलीचा बाप मानस याने थेट पोलिसाच्या मुलाच्या जोरात थोबाडात ठेवून दिली.
जाब विचारला आणि...मुलगा रडत रडत वडिलांकडे आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी आरोपी मानसला माझ्या मुलाला का मारले, असा जाब विचारला. त्यावर आरोपीने पीडित मुलाच्या वडिलांशीही वाद घालत त्यांना धक्काबुक्की करून त्यांचे टी शर्ट फाडले. अखेर महिला पोलिस अधिकाऱ्याने पती आणि पीडित मुलासह बोरीवली पोलिस ठाणे गाठले. आरोपीलाही पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात घेऊन आले. महिला पोलिसाच्या तक्रारीनंतर त्यांनी आरोपी मानसच्या विरोधात मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.