संपत्तीसाठी मुलांकडून होतो पालकांचा छळ, गायिकेला वडिलांचे घर सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:08 AM2021-12-01T11:08:50+5:302021-12-01T11:10:13+5:30
Court News: उच्च न्यायालयाच्या कल्याणकारी न्यायाधिकरणाने गायिका व योगा प्रशिक्षकाला ९५ वर्षीय वडिलांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट सोडण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यास नकार दिला.
मुंबई : मुंबईतील विशेषत: उच्च उत्पन्न असलेल्या समाजातील वृद्ध पालकांची त्यांच्याच पाल्यांकडून संपत्तीसाठी छळवणूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाच्या कल्याणकारी न्यायाधिकरणाने गायिका व योगा प्रशिक्षकाला ९५ वर्षीय वडिलांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट सोडण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यास नकार दिला.
‘खरंच, आमचा अनुभव आहे की, या शहरातील खासकरून येथील श्रीमंत वर्गातील वृद्ध पालकांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सर्व प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत आहे. आपल्याच मुलांकडून संपत्तीसाठी छळ होत असल्याच्या एकामागून एक तक्रारी आमच्यापुढे येत आहेत,’ असे न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले.
प्रत्येक प्रकरणात वृद्ध पालकांची संपत्ती बळकवण्यासाठी त्यांचा छळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालकांच्या शारीरिक किंवा मानसिक आनंद किंवा त्यांच्या चांगल्याचा विचार न करता पालकांची छळवणूक करण्यात येत आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाने गायिका व योगा प्रशिक्षकाला वडिलांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले. गायिकेने न्यायाधिकरणाच्या २७ नोव्हेंबर २०२० च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. गायिकेच्या वडिलांनी न्यायाधिकरणापुढे मुलीविरोधात तक्रार केली होती. मुलीने माझ्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटमध्ये राहावे, असे मला वाटत नाही, असे वडिलांच्या वतीने ॲड. सुजय कांटावाला यांनी न्यायालयाला सांगितले. संबंधित फ्लॅटचे मालक केवळ वडील आहेत आणि मुलीचा त्यावर कोणत्याही प्रकारे हक्क नाही.
मी विधुर असून वयोमानानुसार अनेक आजारांनी मला घेरले आहे. तरीही मुलगी माझी सतत छळवणूक करत आहे आणि माझ्याशी गैरवर्तवणूक करत आहे. ती काही काळ जर्मनीत होती आणि २०१५ मध्ये ती काही काळासाठी मुंबईत परतली. मात्र, आता ती कायमस्वरूपी माझ्याच घरात राहात आहे, असे वडिलांतर्फे काथावाला यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायाधिकरणाने कोणतेही अधिकार नसताना आपल्याला फ्लॅट खाली करण्यास सांगितले. तसेच न्यायाधिकरणाने कायदेशीरपणे प्रक्रिया पार पाडली नाही, असे गायिकेचे वकील प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य करीत न्यायाधिकरणाने दिलेला निकाल योग्य ठरविला.
‘सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या’
वडिलांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक नियंत्रण नव्हते. वृद्धापकाळात आपली मुलगी आपल्याला मदत करील, असे वाटले होते. मात्र, सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या. तिचे घरात काहीही योगदान नाही.
उलट ती असभ्य, आक्रमक असून दिवसेंदिवस तिचे आचरण बिघडत आहे, असे कांटावाला यांनी न्यायालयाला सांगितले. मुलगी सतत छळ करीत आहे आणि फ्लॅटमधील तिचा वाटा सतत मागत असल्याने आपण न्यायाधिकरणात तिच्याविरुद्ध तक्रार केल्याचे वडिलांनी म्हटले.