पोटची लेकरं सोडून गेली; सुरकुतलेल्या गालांवरचे अश्रू कोण पुसणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:50 AM2024-01-21T07:50:47+5:302024-01-21T07:50:57+5:30
सध्या युवकांचा देश म्हणून भारताची ओळख असली तरी काही वर्षांत तो वयोवृद्ध नागरिकांचा देश होणार आहे.
- महेश घोराळे
मुंबई : हात थरथरतात, गुडघेदुखीने उठता-बसता येईना अन् नीट चालताही येईना. झिजलेल्या हाडांची काडं झाली तरी काबाडकष्ट करून दिवस काढावे लागतात. या दिवसात पोटच्या लेकरांचा आधार हवा, पण सुरकुतलेल्या गालांवरचे अश्रू पुसायला तेही जवळ नाहीत. मुलं नोकरी-कामाने गाव सोडून गेली अन् ग्रामीण भारतात थकलेल्या ज्येष्ठांचे प्रश्न गंभीर झाले.
सध्या युवकांचा देश म्हणून भारताची ओळख असली तरी काही वर्षांत तो वयोवृद्ध नागरिकांचा देश होणार आहे. २०५० पर्यंत देशातील ६० वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या ३४.७ कोटी होईल. म्हणजे प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बनेल. सध्या केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एकटे राहणाऱ्या वृद्धांची संख्या वाढत आहे. असेच परिणाम विविध राज्यांमध्ये तीव्रतेने दिसत आहेत. ज्येष्ठांना एकाकी जीवन, रोजगार, आरोग्याचे प्रश्न आणि बिकट अर्थिक स्थितीशी झगडावे लागत आहे.
आजीबाईंची बिकट वाट
श्रमशक्तीमध्ये वयोवृद्ध महिलांचा सहभाग हा २४ टक्के आहे. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा न मिळाल्याने त्यांचा वृद्धापकाळ पुरुषांच्या तुलनेत अधिकअसुरक्षित आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
विवाहित मुलांना त्यांचे आई-वडील नको, पण संपत्ती मात्र हवी. म्हणून मुलांचे पालकांकडे लक्ष नाही. मात्र, संपत्तीवर डोळा असल्याचे अनेक उदाहरणांमधून दिसून येते. वयोवृद्ध आई-वडिलांना गावात सोडून मुले शहरात गेली, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गावात कष्टाची कामे करावी लागतात, तर शहरातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. - हेमंत दानव, वरिष्ठ कार्यकारी, हेल्पएज इंडिया, नागपूर