मुलांना लागली पालिकेच्या बालवाडीत शिकण्याची गोडी; पीपीपी मॉडेलचा सकारात्मक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:51 AM2019-12-03T00:51:40+5:302019-12-03T00:51:56+5:30
तंत्रज्ञानाचा वापर, मुलांच्या वयानुसार अभ्यासक्रम, तसेच विविध वयोगटांच्या मुलांसाठी आकर्षक गोष्टी असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : अधिकाधिक मुले बालवाड्यांकडे वळल्यास शिक्षण प्रवाहासाठी उपयुक्त ठरून विद्यार्थी गळती रोखता येईल, यासाठी सध्या मुंबई महानगरपालिकेकडून (एमसीजीएम) २६ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने ७३८ बालवाड्या सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील ३ वर्षांत यातील विद्यार्थी संख्येत ८०% हून अधिक वाढ झाली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर, मुलांच्या वयानुसार अभ्यासक्रम, तसेच विविध वयोगटांच्या मुलांसाठी आकर्षक गोष्टी असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे मुलांमध्ये बालवाडीत शिकण्याची गोडी निर्माण झाली असून, पालिकेच्या या पीपीपी मॉडेलवरील बालवाड्यांमधील विद्यार्थी संख्या वाढल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली.
पीपीपी तत्त्वावरील या मॉडेलच्या साहाय्याने पालिका शिक्षण पद्धतीत दीर्घकालीन, शाश्वत आणि मोठे बदल करू इच्छित असून, यासाठी मुख्य लक्ष हे पूर्व प्राथमिक क्षेत्रावर केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी रुस्तमजी केरावाला, एम्पायर फाउंडेशन, नोबल फाउंडेशन अशा सेवाभावी संस्था कार्यरत असून, त्यांच्या अखत्यारित बालवाड्या चालविल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विविध सामाजिक संस्थांकडून, तसेच रुस्तमजी केरावाला फाउंडेशन (आरकेएफ)च्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येणाऱ्या ५७५ बालवाड्यांमध्ये सप्टेंबर, २०१८ ते आॅक्टोबर, २०१९ या कालावधीत मुलांच्या पटसंख्येत ८० टक्क्यांनी वाढ झाली. या केंद्रांमधील मुलींचे प्रमाणही वाढले असून, गेल्या पाच महिन्यांत ही संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर, २०१८ मध्ये त्यांची संख्या १०,२२२ होती ती आॅक्टोबर, २०१९ मध्ये १८,२१५ वर गेली. या संस्थेकडे यातील १०१ बालवाड्या चालविण्याची जबाबदारी होती. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कौशल्य, कामाचा अनुभव, शाळांचे परिचालन करण्याची कुशलता तसेच त्यांनी अन्य सामाजिक संस्थांना एकत्र आणल्यामुळे एमसीजीएमच्या बालवाड्यांमध्ये सुधारणा पाहावयास मिळत आहे.
एमसीजीएमबरोबर सहकार तत्त्वावर काम करण्यात आम्हाला आनंद होत असून, मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे व त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी बालवाड्या या महत्त्वपूर्ण ठरत आहेत. बालवाड्यांची वाढती संख्या हे या पीपीपी मॉडेलचे यश आहे. भविष्यात सेवाभावी संस्था अधिक सक्षमपणे परंपरागत शिक्षण पद्धतीला बळकटी आणून लहान मुले व बालकांसाठी चांगले वातावरण निर्माण करू शकतील. आम्ही चांगल्या सुविधा, आधुनिक शिक्षण साहित्य, सुंदर पद्धतीने शिकविणे आणि चांगले शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण देण्यावर भर देत असल्याची प्रतिक्रिया आरकेएफ सेवाभावी संस्थेचे ट्रस्टी रुस्तम केरावाला यांनी दिली.
प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आणि प्रत्येक वर्षी आम्ही या प्रकल्पांतर्गत काही बालवाड्यांचा समावेश करत आहोत. यामुळे या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक मुले सहभागी होत असून, विद्यार्थी संख्या वाढत आहे. यामुळे मुलांना सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे पूर्व प्राथमिक शिक्षण हे कोणताही भेदभाव न करता देण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि ते पूर्ण होत आहे. - महेश पालकर, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालिका.