कोवळ्या वयात मुलांना आईची गरज - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 08:01 AM2021-10-01T08:01:40+5:302021-10-01T08:02:19+5:30
कोवळ्या वयात मुलांना आईच्या सोबतीची गरज असते. त्यामुळे तिला मुलाचा ताबा मिळणे स्वाभाविक आहे : न्यायालय
मुंबई : मुलाला आईच्या ताब्यात ठेवणे, हे स्वाभाविक आहे आणि मुलाच्या कल्याणासाठी, विकासासाठी अनुकूल आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका टीव्ही अभिनेत्रीच्या मुलाचा ताबा तिच्या पतीकडे देण्यास नकार दिला.
संबंधित अभिनेत्रीला मुलाचा ताबा आपल्याकडे देण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी तिच्या पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. मुलाचा ताबा त्याच्या आईला देण्यात आला तर मुलाचे कल्याण आणि विकास खुंटेल, असे दिसत नाही, असे म्हणत न्यायालयाने अभिनेत्रीच्या पतीची मागणी फेटाळली. कोवळ्या वयात मुलांना आईच्या सोबतीची गरज असते. त्यामुळे तिला मुलाचा ताबा मिळणे स्वाभाविक आहे आणि मुलाच्या विकासासाठी व कल्याणासाठी ते अनुकूल आहे, असे न्यायालयाने म्हटले.
मुलांना आई-वडील दोघांच्याही प्रेमाची व जिव्हाळ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुलाला वडिलांनाही भेटू द्यावे, असे म्हणत न्यायालयाने अभिनेत्रीला तिच्या पतीला व मुलाला दररोज अर्धा तास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भेटून देण्याचे निर्देश दिले. तसेच आठवड्यातून दोनदा वडिलांना मुलाला प्रत्यक्षात भेटण्यास द्यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘याचिकाकर्ते (वडील) आणि प्रतिवादी क्रमांक (२) जी पडद्यावर पात्र साकारण्यात निपुण आहेत, हे दोघेही वास्तविक जीवनात मुलाच्या हितासाठीच काम करतील, अशी आम्हाला आशा व विश्वास आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
याचिकेनुसार, अभिनेत्रीने मुलाला बेकायदेशीररीत्या त्यांच्या मुलाला तिच्या एकटीच्या ताब्यात घेतले. अभिनेत्री ही खऱ्या आयुष्यातही मुलाची काळजी घेत असल्याचा अभिनय करीत आहे. तिच्या व्यस्त कामकाजात ती मुलाच्या गरजेकडे लक्ष देऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्यांची वकील स्वप्ना कोदे यांनी युक्तिवाद केला. तर अभिनेत्रीतर्फे ॲड. हृषिकेश मुंदर्गी यांनी या याचिकेला विरोध केला. मुलगा आईबरोबर आनंदी आहे. जर त्याचा ताबा वडिलांना दिला तर ते मुलाच्या विकासासाठी योग्य नसेल, असा युक्तिवाद त्यांनी केला.
काय म्हणाले न्यायालय?
वैवाहिक मतभेदामुळे जोडप्याला एकमेकांप्रति वैरभावना आहे. जिथे पालकच एकमेकांशी भांडतात, अशा परिस्थितीत मुलाचा ताबा कुणाकडे द्यायचा, याबाबत निश्चित मापदंड आहेत. आमच्या दृष्टीने, अल्पवयीन मुलाच्या कल्याणाचा मुद्दा हा एका पालकाच्या कामाच्या बांधिलकीवर व दुसऱ्या पालकाकडे मुबलक वेळ उपलब्ध आहे, यावर ठरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.