नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून कोणाची चर्चा? संपूर्ण यादी

By यदू जोशी | Published: August 28, 2024 08:27 AM2024-08-28T08:27:09+5:302024-08-28T08:27:38+5:30

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय वारसा असणाऱ्या काही जणांना संधी मिळेल, असे चित्र आहे. 

children of the leaders will enter the assembly elections in maharashtra | नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून कोणाची चर्चा? संपूर्ण यादी

नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून कोणाची चर्चा? संपूर्ण यादी

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेची सध्या जोरात चर्चा असून, आगामी विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची लाडकी मुले-मुली भाग्य अजमावण्याची शक्यता आहे. राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असली आणि त्याला काहींचा विरोध असला तरी राजकीय वारसदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राचे राजकारण गाजविणाऱ्या अनेक नेत्यांची मुले-मुली, जवळचे नातेवाईक हे वारसदार म्हणून पुढे आले आणि राजकीय पटलावर स्थिरावलेदेखील. आगामी निवडणुकीत राजकीय वारसा असणाऱ्या काही जणांना संधी मिळेल, असे चित्र आहे. 

वाशिममधील कारंजाचे आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र जायक आता मतदारसंघात सक्रिय झाले. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क यांनी  काटोल मतदारसंघात संपर्क वाढविला. माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण-पश्चिम नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील हे काटोलमधून शरद पवार गटाकडून लढतील, अशी शक्यता आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊतही यावेळी सज्ज आहेत. युवक काँग्रेसच्या कोट्यातून यावेळी तिकिटे द्या, असे विधान नितीन राऊत यांनी अलीकडेच केले होते. 

वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांना काँग्रेस संधी देणार का ?
सावनेरमध्ये (जि. नागपूर) स्वत: लढू शकत नसल्याने माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या कन्येला लढवू शकतात. दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल काँग्रेसतर्फे दावेदार आहेत. विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. त्यांच्या कन्या शिवानी यांना चिमूरमधून काँग्रेस संधी देणार का, हा विषय चर्चेचा आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. भाजप तिथे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल यांना रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या जागी पुत्र जय लढणार असल्याची चर्चा
आपण बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जय लढणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघात माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांच्या नावाची चर्चा आहे. याच ठिकाणी भाजपच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल हेही दावेदार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहेत्रे यांच्या कन्या शीतल, माढामध्ये आमदार बबनदादा की पुत्र रणजितसिंह की पुतणे धनराज या बाबतच्या उत्कंठा आहे. 

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (अजित पवार गट) यांच्याविरुद्ध त्यांचे पुत्र गोकुळ (शरद पवार गट) हे बंडाच्या तयारीत आहेत.

मराठवाड्यात कोणाची आहे चर्चा?

- माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना भोकर, जि. नांदेड येथून भाजपची उमेदवारी मिळू शकते. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनाच परतूरमधून पुन्हा संधी द्यायची की, त्यांचे पुत्र राहुल यांना उतरवायचे हा निर्णय भाजप घेईल.

- बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांना अलीकडेच त्यांचे वारसदार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे जयसिंह विधानसभा लढतील, असे मानले जात आहे.

- छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेवर गेलेले शिंदेसेनेचे नेते संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरतील, असे म्हटले जाते.

दोन नातवांपैकी कुणाला संधी?
अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध त्यांची कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री या लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार असोत की नितीन राऊत असो काँग्रेस एका घरात एकच उमेदवारी देणार, हे स्पष्ट आहे, त्यामुळे पुढच्या पिढीला आणखी तरी वाट बघावी लागणार असे दिसते. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांपैकी अनिकेत की बाबासाहेब देशमुख याच्या फैसल्याबाबतही उत्कंठा आहे.

Web Title: children of the leaders will enter the assembly elections in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.