मुलांनी आयुष्यभर आपल्यातली निरागसता जोपासावी – विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 07:05 PM2017-11-14T19:05:00+5:302017-11-14T19:05:11+5:30
दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमट दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे.
मुंबई, दि. १४ : दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमट दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बालदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. यावेळी बालभवनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नामवंत बाललेखिका विजया वाड, बालभवनचे संचालक राजेंद्र अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तावडे यांनी बालभवनच्या सभागृहात जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध छायाचित्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना विद्यार्थ्यांकडून त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेतली. छायाचित्र कलेमध्ये सफाईदारपणा आणि सर्जनशीलता येण्यासाठी वेगवेगळी रंगसंगती वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना तावडे म्हणाले की, बालभवनच्या परिसरात आज या लहान मुलांची चित्रकला बघतांना मला लहानपणीचे दिवस आठवले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली वेगवेगळी छायाचित्रे त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवणारी आहेत. लहानपणी आपल्याला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवलं, त्यावेळी या विषयात मला रुची यायला लागली. तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन पुस्तकांशी संवाद साधायला शिका. त्यामुळे अभ्यास हा कंटाळवाणा न होता ती एक आनंददायी प्रक्रिया बनून जाईल. पाठ्यक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन वाढवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा सल्ला देखील या प्रसंगी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.