मुंबई : जी कामे घरात मुली करतात, ती सर्व कामे केवळ मुलींची नसून मुलांनीही करावीत आणि मुलांची कामे मुलींनीही करावीत हे समानतेचे विचार लहान वयापासून मुलांमध्ये वृद्धिंगत व्हावेत, मासिक पाळीबद्दल मुलांनाही माहिती देण्यात यावी, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक सभा, पालक संघाच्या बैठकीत जागरूकता निर्माण करायला हवी. सोबतच इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील मुलामुलींसाठी चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबाबत जागरूकता निर्माण करायला हवी. जेणेकरून मानसिक, शारीरिक त्रास, लैंगिक शोषणसारखे प्रकार मुलांसोबत घडल्यास त्यांना त्याची भीती न वाटता शिक्षक, पालक, मित्र यांना ते त्याची माहिती देतील. यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे, त्यांच्या कामगिरीचा ठसा अन्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरावा तसेच राज्याच्या शाळांमधील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा, स्वत:च्या हक्काची व कर्तव्याची जाणीव व्हावी, या यामागील हेतू आहे. याअंतर्गत इयत्ता ८वी ते १०वीच्या वर्गांमध्ये ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करून मुलामुलींचा सहभाग त्यामध्ये नोंदविण्याचे परिपत्रकात नमूद आहे.
युनिसेफ व काही स्वयंसेवी संस्थांनी जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घटक संच विकसित केले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये याचा उपयोग करून घ्यावा, असे शाळांना सूचित करण्यात आले आहे. मासिक पाळीबाबतचे समज-गैरसमज, रूढी-परंपरा, समस्या, त्यासंदर्भातील वैज्ञानिक माहिती याबाबत विशेषत: मुलांमध्ये जागृती करण्यासाठी शाळेमध्ये जीवन कौशल्ये शिकविली जावीत. ९वी ते १२वीचे वर्ग असणाऱ्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मुलांचे प्रबोधन वर्ग आयोजित करावेत. भावनांवर नियंत्रण ठेवणे, मुलीकडून एखाद्या बाबीसाठी नकार आल्यास त्याचा स्वीकार करणे, तिच्या मतांचा आदर करणे हे प्रबोधन वर्गांद्वारे मुलांना शिकविणे अपेक्षित आहे.सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वकमुलींबद्दलचे विनोद, चुकीचे विचार किंवा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त न करणे, इतरांनी व्यक्त केलेले चुकीचे विचार फॉरवर्ड किंवा लाइक न करणे, सोशल मीडियाचा जाणीवपूर्वक व जबाबदारीने वापर करणे याबद्दलही धडे देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.