परदेशात मुलांची तस्करी

By admin | Published: April 23, 2017 03:43 AM2017-04-23T03:43:01+5:302017-04-23T03:43:01+5:30

गरीब कुटुंबातील मुलांना बनावट पासपोर्ट व व्हिसाच्या आधारावर परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पंजाबातील

Children smuggled abroad | परदेशात मुलांची तस्करी

परदेशात मुलांची तस्करी

Next

मुंबई : गरीब कुटुंबातील मुलांना बनावट पासपोर्ट व व्हिसाच्या आधारावर परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पंजाबातील चार शाळकरी मुलांना युरोपमध्ये घेऊन जाणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
आरिफ शफी फारुकी (वय ३८), राजेश बालाराम पवार (४६) व फातिमा फरीद अहमद (४८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ हजार युरो, पासपोर्ट, व्हिसा व तिकिटे जप्त केली आहेत.
या प्रकरणातील फारुकी हा दलाल असून, अन्य दोघे जण अल्पवयीन मुलांचे पालक असल्याचे भासवून घेऊन जात होते. गरजू कुटुंबीयाकडून विकत घेणे किंवा अपहरण केलेल्या मुलांना परदेशात धनाढ्य व्यक्तीकडे घरगडी म्हणून कामाला पाठविणारे हे मोठे रॅकेट आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांगितले.
सुटका करण्यात आलेली चारही मुले १४ ते १६ वयोगटातील असून, मूळची पंजाबमधील अमृतसर येथील आहेत. मुलांची तस्करी करणाऱ्या दलालाकडून चार मुलांना परदेशात नेण्यात येणार असल्याची माहिती जबरी दरोडाविरोधी पथकाला मिळाली होती.
फारुकीने त्यासाठी पवार व अहमद यांना त्यांचे आईवडील असल्याचे भासवून चारही मुलांचे बनावट पासपोर्ट बनविले. त्याचप्रमाणे युरोपचा व्हिसा बनविला होता. त्यानुसार प्रभारी निरीक्षक अशोक खोत, सहायक निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल-२ येथे सापळा रचून त्यांना अटक करीत चार मुलांना ताब्यात घेतले.
पवार व फातिमा यांच्यावर चौघांना युरोपमध्ये नेऊन तेथे स्थायिक झालेल्या मूळच्या भारतीय असणाऱ्या नागरिकांकडे सोडून येण्याची जबाबदारी होती.
या मुलांचा परदेशात नेमक्या कोणत्या कारणासाठी वापर केला जाणार होता? त्यांना कोठून व कोणत्या कारणाने ताब्यात घेतले? त्यांच्या पालकांना कोणते आमिष दाखविले? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. या रॅकेटमध्ये अन्य काही जण असून, त्यांनी अशा प्रकारे किती मुलांची परदेशात तस्करी केली आहे? याचा तपास सुरू असल्याचे सातव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Children smuggled abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.