Join us

सहव्याधी असलेली लहान मुले अतिजोखमीच्या गटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:05 AM

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ, तरुण ...

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ, तरुण वयोगटातील नागरिकांना अधिक संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर संभाव्य तिसऱ्या लाटेत लहानग्यांना धोका असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नाेंदवले आहे. त्यातही आता सहव्याधी असलेली लहान मुले संसर्गाच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात असल्याने या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होतील, असे सिद्ध झालेले नाही. मात्र, संभाव्य संसर्गात रक्तक्षय, कुपोषण, स्थुलता, हृदय व यकृतविकार, रक्ताचे आजार तसेच काही मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या असलेली मुले अतिजोखमीच्या श्रेणीत असतील. लहान मुले काेराेनाबाधित झाल्यास बहुतांश वेळा लक्षणेविरहीत असतात. त्यामुळे मुलांना ताप आल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा पालकांनी बालरोगतज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शून्य ते अठरा वयोगटातील बाधित मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची फारशी गरज भासली नसल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल पारेख यांनी दिली.

राज्य शासनाने लहान मुलांवर उपचार करण्यासाठीची नियमावली तयार केली आहे. याबाबत शहरासह जिल्ह्यातील आशासेविका, परिचारिकांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. बाधित लहान मुलांवर उपचार करताना काय काळजी घ्यावी, याबाबतचे हे प्रशिक्षण होते. दरम्यान, इन्फ्लुएन्झाची लस लहान मुलांना इतर आजारांपासून संरक्षण देते. त्यामुळे ही लस लहान मुलांना दिल्याने कोरोना संसर्गापासून संरक्षण होत नाही, असे मत राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी मांडले.

* संमिश्र वातावरणातही आजारांचा धोका

पावसाळ्यात वातावरणातील चढउतार, दूषित पाणी पिणे किंवा डासांची उत्पत्ती अशा विविध कारणांमुळे साथीच्या आजारांचा धोका असतो. काेरोना महामारी सुरू असून, अशा साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. काेरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून इतर विषाणूजन्य आजारांपासूनही स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. हे सर्वच आजार मागील वर्षी तुलनेने कमी होते, त्यामुळे नागरिक यंदा गाफील राहण्याची शक्यता आहे. मात्र, तसे होऊ नये, यासाठी नागरिकांना सावध करणे आवश्यक आहे. डेंग्यूपासून बचावासाठी घराच्या परिसरात डास होऊ नयेत, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उघड्यावरचे खाणे किंवा पाणी पिणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार यांची लक्षणे दिसताच अंगावर काढू नये, वेळीच याेग्य उपचार घ्यावे, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

................................