मुंबई: मुसळधार पावसामुळे वांद्रे येथे रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असलेल्या खाडी परिसर तुडुंब पाण्याने भरला आहे. ही जागा पोहणे आणि फिरणे यासाठी खूपच धोकादायक आहे. असे असताना या खोल पाण्यात शालेय विद्यार्थी आणि तरुण खोल पाण्यात पोहोण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी उतरत आहेत. याकडे स्थानिक रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
वांद्रे ( पूर्व ) येथील झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयापासून वांद्रे रेल्वे स्थानकापर्यंत विस्तीर्ण असा मोकळा खाडी परिसर आहे. ही जागा रेल्वे प्राधिकरण आणि पालिकेच्या अखत्यारित येते. येथील खाडी भाग खोल असून साप,अजगरांचा येथे वावर असतो. मुसळधार पावसाने येथील खाडी पात्र तुडुंब भरले आहे. त्यामुळे पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे.
अशात येथील पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी आणि पोहण्यासाठी परिसरातील काही शालेय विद्यार्थी आणि तरुण येथे गर्दी करीत आहेत. नागरी रहदारीपासून हा परिसर बंदिस्त असल्याने पाण्यात बुडून किंवा सर्प दवंशांची घटना होण्याची शक्यता येथील काही जागृत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र या गोष्टीकडे स्थानिक पोलीस, पालिका प्रशासन आणि रेल्वे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.