मुंबई : विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. मुंबई पालिकेच्या बाई य. ल. नायर रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई.आय.आर.सी.सी.) उभारण्यात आले आहे. हे केंद्र खासगी रुग्णालयापेक्षाही अधिक दर्जेदार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अशाच प्रकारे प्रत्येकी एक उपचार केंद्र सुरू करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. नायर रुग्णालयाच्या पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यावर उपचार करणे ही कठीण आणि आव्हानात्मक बाब आहे. त्यासाठी अतिशय जिद्द आणि अथक प्रयत्न करावे लागतात. पालिकेच्या या केंद्राचा आदर्श घेऊन अशा स्वरूपातील केंद्र ठाणे आणि राज्यातील इतर शहरांमध्येही उभारण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या केंद्रासाठी उत्तम व प्रशिक्षित असा वैद्यकीय चमू कार्यरत आहे.
आमदार रईस शेख यांच्या मुलीवर नायर रुग्णालयातील प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलांना पालिकेच्या रुग्णालयात उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार रईस शेख यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे कुमारी बुशरा रईस शेख हिच्या हस्तेही हे उद्घाटन करण्यात आले.
केंद्राची वैशिष्ट्ये :
० ते १८ वयोगटातील विशेष मुलांसाठी नायरमधील केंद्रात सोमवार ते शुक्रवार स़ ९ ते दु़. ४ या वेळेत, तर शनिवार स ९ ते दु़. १ या वेळेत सुरू राहणार.
कान, नाक, घसा, नेत्रशल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, बालरोगचिकित्सा, मनोविकृती, फिजिओथेरपी, ऐकणे व बोलण्याच्या विकृतीसह दातांवरील उपचारांसाठी संबंधित विभाग कार्यरत राहणार.