लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भायखळा येथील वीर जिजामाता प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत आता बच्चे कंपनीला खुल्या डबलडेकर बसमधून उद्यान सफारीचा आनंद लुटता येणार आहे. लंडनमधील बसच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, यासाठी निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त केला असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाचे जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली.
राणी बागेतील पक्षी आणि प्राण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना विशेषतः बच्चे कंपनीला अधिक आनंद घेता यावा, आता बागेची सफर डबलडेकर बसमधून घडवण्याचा पालिकेचा इरादा आहे, तसेच उद्यानात ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसाठी बॅटरीवर धावणाऱ्या चार वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली असून, त्याच्याकडून प्रायोगिक तत्त्वावर ही बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे. सध्या कंत्राटदाराच्या कारखान्यात या बसचे काम सुरू असून ती लवकरच सेवेत दाखल होईल, असे साटम म्हणाले.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. या उद्यानात सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६० कोटी खर्च केले जाणार आहेत.
ध्वनी, वायू प्रदूषणावर मात करणे शक्य
बच्चे कंपनीसाठी सुरू करणाऱ्या या बसमध्ये १० ते १२ मुले एका वेळेस बसू शकतील. या बससाठी किमान शुल्क आकारले जाणार असून, पावसाळ्यानंतर ही बस दाखल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला केवळ एकच बस दाखल होणार असून त्यानंतर आणखी बस दाखल होणार आहेत. या सर्व बस आणि वाहने बॅटरीवर चालणार असल्याने ध्वनी अथवा वायू प्रदूषण होणार नाही, असेही साटम यांनी सांगितले.