मुंबई : फेसबुक, व्हॉट्सअॅप , स्नॅपचॅट व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्याला पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद धक्काच असेल. असाच सुखद धक्का. धारावी, सायन परिसरात राहणाऱ्या डी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बसला. शाळेत जाणाऱ्या त्यांच्या पाल्यांनी स्वत:च्या पालकांना उद्देशून लिहिलेलं चक्क इंग्रजीतील पोस्ट कार्ड त्यांच्या घरी पोहोचले. आपल्याला इंग्रजी येत नसले तरी आपल्या मुला-मुलींना इंग्रजी लिहिता-बोलता येतंय, याचे या कष्टकरी पालकांना निश्चितच समाधान वाटले. १२-२७ एप्रिलमध्ये डी. एस. हायस्कूलने आयोजित व्यावहारिक इंग्रजी सराव शिबिर आपल्या शाळेत सुरू केले असून त्याद्वारे हा उपक्रम सुरू झाला आहे.
सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्यांचे - तब्बल १६ दिवसांचे व्यावहारिक इंग्रजी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. दररोज सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत आयोजित केलेल्या या शिबिरात इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थी झाले होते. विद्यार्थ्यांनी पुस्तकी इंग्रजीपुरते मर्यादित न राहता रोजच्या जगण्यातील इंग्रजी संभाषण त्यांना अवगत व्हावे, या उद्दशाने या शिबिरात अनेक अभिनव उपक्रम राबवण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना स्पोकन इंग्रजीचे शिक्षक राकेश दमानिया यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक रेसिपी शो घेतला, पाककृतीतील पदार्थांची नावे, त्यातील जीवनसत्त्वे, प्रत्यक्ष पाककृती याविषयी विद्यार्थ्यांनी इंग्रजीत सादरीकरण केले. विशेष म्हणजे, या शिबिरातील एक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेजवळच्या सायन टपाल कार्यालयाला भेट दिली आणि तिथल्या पोस्ट मास्तरांना प्रश्न विचारून टपाल वाटपाची प्रक्रियाही जाणून घेतली.
इंग्रजीच्या व्याकरणाच्या भीतीमुळे अनेकदा मराठी माध्यमातील विद्यार्थी इंग्रजी बोलणे टाळतात. पण अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी व्याकरणापेक्षा आत्मविश्वासाची आणि सरावाची जास्त आवश्यकता असते. दैनंदिन जगण्यातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये विद्यार्थ्यांना साधं-सोपं इंग्रजी बोलण्याचा सराव व्हावा, या हेतूनेच आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत व्यावहारिक इंग्रजी सराव शिबिर आयोजित केले होते असे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.
व्यावहारिक इंग्रजी सराव शिबिरातील उपक्रमशब्दांशी खेळा- नव्या इंग्रजी शब्दांची ओळख आणि त्यांचा वापर बोलण्यात करा.पत्रलेखन - पालकांना इंग्रजीत पत्र लिहून भावना व्यक्त करा.परिसर भेट - टपाल कार्यालयाला भेट देऊन इंग्रजीत प्रश्न विचारून तिथले व्यवस्थापन समजून घेणे.कल्पनेची भरारी- शिक्षकांनी दिलेल्या एका शब्दापासून इंग्रजीत गोष्ट रचणे आणि ती सर्वांना सांगणे.नाटुकली - एका विषयावर इंग्रजीत नाटुकली लिहायची आणि ती सादर करायची.संवाद - वर्गात आलेल्या विशेष पाहुण्यांशी इंग्रजीत मनमोकळा संवाद साधणे.