बच्चेकंपनीच्या शिट्ट्या, टाळ्यांच्या तालावर सुसाट धावली मोनो रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:43 AM2019-03-05T00:43:04+5:302019-03-05T00:43:16+5:30

वेगाने मागे जाणारी झाडे, गगनचुंबी इमारती, नजर जाईल तिथवर पसरलेल्या झोपड्या, खारफुटी, मिठागरे, भलीमोठी धुरांडी, नागमोडी रस्ते आणि लोभसवाणी मुंबई, असा काहीसा नजरा मुंबईकरांना सोमवारी अनुभवता आला.

The children's company, the mono rail runs smoothly on the lock of talents | बच्चेकंपनीच्या शिट्ट्या, टाळ्यांच्या तालावर सुसाट धावली मोनो रेल्वे

बच्चेकंपनीच्या शिट्ट्या, टाळ्यांच्या तालावर सुसाट धावली मोनो रेल्वे

Next

मुंबई : वेगाने मागे जाणारी झाडे, गगनचुंबी इमारती, नजर जाईल तिथवर पसरलेल्या झोपड्या, खारफुटी, मिठागरे, भलीमोठी धुरांडी, नागमोडी रस्ते आणि लोभसवाणी मुंबई, असा काहीसा नजरा मुंबईकरांना सोमवारी अनुभवता आला. निमित्त होते ते वडाळा ते सात रस्ता या दुसऱ्या टप्प्यावर धावलेल्या मोनो रेल्वेचे. महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असल्याने, सोमवारी मोनोचा प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांनी तुफान गर्दी केली होती. रात्री दहा वाजेपर्यंत २७ हजार ६१९ प्रवाशांची नोंद करण्यात आली. पहिल्या दिवशी बच्चेकंपनीने मोठ्या प्रमाणावर मोनोमधून प्रवास केला. प्रत्येक स्थानकावर मोनो थांबत असताना आणि सुरू होत असताना प्रवाशांचे स्वागत बच्चेकंपनीकडून टाळ्यांसह शिट्ट्यांनी होत होते.
वडाळा ते सात रस्ता या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. याआधी मोनो चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यात धावत होती. सोमवारी पहिल्यांदाच ती चेंबूर-वडाळा-सात रस्ता या पूर्ण मार्गावर धावली. वडाळा ते सात रस्ता हा मोनोचा प्रवास मुंबईकरांसाठी नवा होता. परिणामी, या टप्प्यावर म्हणजेच जी.टी.बी. नगर, अ‍ॅण्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल, संत गाडगे महाराज चौक या प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची गर्दी होती. विशेषत: अबालवृद्धांसह तरुण-तरुणीदेखील मोनोचा प्रवास करत होते. ऐसपैस जागा आणि आसन व्यवस्था कमी असल्याने अधिकाधिक प्रवासी मोनो रेल्वेच्या डब्यात मावत होते. महत्त्वाचे म्हणजे, थंडगार एसीमध्ये हा प्रवास करत प्रवाशांना मध्य आणि पूर्वेकडील मुंबईचे दर्शन घेता येत होते. वडाळा ट्रक टर्मिनस, रासायनिक कंपन्या, जिथवर नजर जाईल तेवढ्या झोपड्यांसह गगनचुंंबी इमारती, नागमोडी रस्ते, वाहणारे मोठे नाले आणि मिठागरे हा ‘एरियल व्ह्यू’ मोनो रेल्वेमधील प्रवाशांना पाहता येत होता.
वडाळा ते सात रस्ता या टप्प्यात जेथून जेथून मोनोरेल पुढे जात होती; तेथील पादचारी, वाहन चालक, स्थानिक रहिवासी मोनोकडे
हात उंचावत कुतूहलाने पाहत होते. शिवाय दुसºया ट्रॅकवरून
जात असलेल्या मोनोरेलमधील प्रवासी एकमेकांकडे पाहून हात उंचावत होते.
>तिकीट दर
चेंबूर ते भारत पेट्रोलियम : १० रुपये
चेंबूर ते आचार्य अत्रेनगर : २० रुपये
चेंबूर ते मिंट कॉलनी : ३० रुपये
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक : ४० रुपये

वेळेची होणार बचत
मोनो रेल्वेचा पूर्ण मार्ग हा १९.५४ किलोमीटर लांबीचा आहे.
चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे लागत होती.
आता मोनोचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रवास करण्यासाठी ३० मिनिटे लागत आहेत.
संपूर्ण टप्प्यावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो रेल्वे प्रत्येक २२ मिनिटांनी धावेल.

चोख सुरक्षा व्यवस्था
मोनो रेल्वेच्या प्रत्येक टप्प्यावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तिकीटघरांसह चेक पॉइंट, फलाटांवरही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
>मोनोच्या आतही सुरक्षा
मोनो रेल्वेमधून प्रवास करताना पुरुष आणि महिला प्रवाशांना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी आतही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. एसी बंद असणे किंवा संबंधित तांत्रिक अडचणी आल्यास सुरक्षारक्षकांकडून प्रवाशांना मदत केली जाते.
>सेल्फी विथ मोनो : मोनोमधून प्रवास करत असलेल्या जवळजवळ सर्वच प्रवाशांनी मोनो रेल्वेसोबत सेल्फी काढले. काढलेले सेल्फी सोशल नेटवर्क साइटवर अपलोड करत आपल्या मोनो प्रवासाचा अनुभवही शेअर केला.
>...आणि मोनो बंद पडली
पहिल्याच दिवशी मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनो बंद पडली आणि एमएमआरडीएवर नामुश्कीची वेळ आली. वडाळा डेपो स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने, मोनो काही काळ ताटकळत होती. परिणामी, प्रवाशांना काहीशा अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, तासाभरातच ती पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
>ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
मोनो रेल्वेच्या डब्यांमध्ये आसन व्यवस्था कमी आहे. अधिकाधिक प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. आसन व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. सोमवारच्या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आसन व्यवस्था रिकामी ठेवली होती.
>सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत
मोनो रेल्वेमधून २७ हजार ६१९ प्रवाशांनी प्रवास केला. याद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला
५ लाख १९ हजार ९३
महसूल प्राप्त झाला.
स्थानके प्रवासी महसूल
चेंबूर २,७९५ ५९,५८०
व्ही.एन. पुरव ३२० ७,५२०
फर्टिलायझर टाउनशिप ६६० १३,४५७
भारत पेट्रोलियम १,९७२ २७,८०६
मैसूर कॉलनी ५६० १२३८५
भक्ती पार्क ५१२ ९१३१
वडाळा डेपो ७३१ १३५७०
जी.टी.बी. नगर ५५२ ९५००
अ‍ॅण्टॉप हिल ६६२ ११७१०
आचार्य अत्रे नगर ६७५ ८८२०
वडाळा ब्रीज ८३९ १५५९०
दादर पूर्व ६९५ ११७५०
नायगाव ६७२ ११४००
आंबेडकर नगर ६२२ १०७८०
मिंट कॉलनी ५८९ ९०५०
लोअर परेल ९७८ १८४९०
संत गाडगे महाराज चौक २२७६ ५१२००

Web Title: The children's company, the mono rail runs smoothly on the lock of talents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.