Join us

बालनाट्यांची शाळा भरली! बच्चेकंपनीसाठी २५ नाटकांची मेजवानी

By संजय घावरे | Published: May 14, 2023 10:06 PM

बालनाट्य शिबिरांमधील किलबिलाट वाढला

मुंबई - एप्रिल-मे महिन्यांची सुट्टी म्हणजे बच्चेकंपनीसाठी बालनाट्य आणि नाट्यशिबिरांची जणू मेजवानीच असते. कोरोनाच्या काळात थंडावलेली बालनाट्यांची चळवळ या वर्षी जोमात आहे. यंदाच्या मोसमात बच्चे कंपनींसाठी जवळपास २५ बालनाट्यांची जत्रा भरली असून, मुंबई-ठाण्यामध्ये शंभरच्या आसपास नाट्य शिबिरांमध्ये कलाकार घडवणारी शाळा सुरू आहे.

बालनाट्य आणि शिबिरे हा रंगभूमीचा पाया मानला जातो. बालपणापासूनच कलाकार घडवणाऱ्या या शाळेत आजवर अनेक कलाकार घडले असून, बरेचजण आज चित्रपट, नाटक, मालिका आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. यातील काहींना सुट्टीतील नाट्यशिबिरांनी घडवले आहे. सध्या मुंबई-ठाण्यामध्ये लहान-मोठी बरीच नाट्य शिबिरे सुरू आहेत. यापैकी काही शिबिरांमध्ये केवळ कलाकार घडवले जातात, पण काहींमध्ये रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करण्यापर्यंत बालकांना पाठबळ दिले जाते. विद्या पटवर्धन-साधना करमरकर यांच्या नाट्यशिबिरांची परंपरा आजही बऱ्याच रंगकर्मींनी पुढे सुरू ठेवली आहे. यामध्ये बेसिक आणि अॅडव्हान्स अशा दोन भागांमध्ये मुलांना प्रशिक्षण दिले जाते. 

'जाड्या रड्या आणि चमच्या', 'बोक्या सातबंडे' आणि 'घोस्ट एका जंगलाची' या मोठ्या नाटकांच्या जोडीला बरीच छोटी बालनाट्ये रंगभूमीवर आली आहेत. वर्षभर इतक्या नाटकांचे प्रयोग होत नसल्याने सध्या बाल प्रेक्षकांपुढील पर्याय वाढले आहेत. त्यामुळे बुकींग कमी आहे. गाजलेल्या 'अलबत्या-गलबत्या'ला ७० टक्के, तर इतरांना केवळ ४० टक्के बुकींग मिळत आहे. एका तिकिटामध्ये दोन, तीन किंवा चार बालनाट्ये दाखवली जातात. यंदा एकाच वेळी बरीच नाटके आल्याने बुकींग कमी आहे. शनिवार-रविवार मिळवण्यासाठी व्यावसायिक नाटकांच्या निर्मात्यांच्या मदतीने तारखा बुक केल्या जात आहेत. 

३००-५०० रुपये नाटकाचे तिकीट४ ते १० हजार रुपये शिबिराची फी५-७ ते १५ वर्षे वयोगटातील मुले२०-३० मुले एका नाट्य शिबिरात१० दिवस बेसिक नाट्यशिबिर१५ दिवस अॅडव्हान्स नाट्यशिबिर

बालरसिकांच्या सेवेत...अलबत्या गलबत्या या नाटकाच्या जोडीला जाड्या रड्या आणि चमच्या, बोक्या सातबंडे, घोस्ट एका जंगलाची, कट्टी बट्टी शिट्टी, बालवाडीचे बच्चमजी, बलवान भीम आणि हनुमान, अल्लादिन आणि जादुई जीन, सिंड्रेला आणि बार्बी, मोगली आणि मिकी माऊस, पैशाचे झाड, फजिती फटाके फराळांची, पक्षांची पिकनिक, फनी राजकन्या, हिम गौरी आणि सात बुटके, नाटू नाटू, जादूचा दिवा, लेडी हॅरी पॅाटर, माय मॅाम द... बेस्ट, आई मला क्षमा कर, धमाल माकडांची कमाल, फुग्यातला राक्षस, टेडी आणि डोरेमाॅन, जोकर आणि जादूगार, ब्रह्मराक्षस, मु मूचा उ अशी २५ नाटके बाल रसिकांचे मनोरंजन करत आहेत.

- अशोक पावसकर (लेखक-दिग्दर्शक)'जाड्या रड्या आणि चमच्या' हे माझे ५० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक आता गणेश पंडीतच्या दिग्दर्शनाखाली आणले आहे. कथाविस्तार माझा असून, काळानुरुप बदल केले आहेत. केवळ सुट्ट्यांपुरते नव्हे, तर याचे वर्षभर प्रयोग करण्याचा मानस आहे. यासाठी मोठे कलाकार घेतले आहेत. मुलांसाठी नाट्यशिबिरे घेण्यासोबतच त्यांच्यासाठी नाटकांचे प्रयोगही केले पाहिजेत.

- गौरी केंद्रे (दिग्दर्शिका-नाट्यप्रशिक्षीका)यंदा शिबिरांना चांगला रिस्पॅान्स मिळत आहे. बेसिक आणि अॅडव्हान्स हे दोन कोर्स वेगळे असतात. मुलांना नाटकासाठी तयार केलं जातं. त्यांची भीती दूर केली जाते. रंगकर्मी नाट्य संस्कार करतात. मुलांची मानसिकता, भाषा समजून तयार केलं जातं. स्टेजवर उभे राहण्याचा आत्मविश्वास मुलांना येतो. हे माझ्या कारकिर्दीचं २५ वे वर्ष असल्याने वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.

- राजू तुलालवार (उपाध्यक्ष, बालरंगभूमी परिषद)यंदा मोकळे वातावरण असल्याने बालनाट्य संस्थांचा उत्साह आहे. त्यामुळेच नाटकांची संख्या वाढली आहे. चिल्ड्रन्स थिएटरचे प्रत्येक नाटक विशिष्ट वयोगटासाठी असते. नाटक कोणत्या वयोगटासाठी हे आम्ही जाहिरातीत लिहितो. सेलिब्रिटीजच्या बालनाटकांचा हेतू नफा कमावणे असतो, तर लहान मुलांसोबत नाटक करणाऱ्या संस्था त्यांना घडवण्यासाठी नाटक करतात.

टॅग्स :मुंबई