Join us

किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनीची लगबग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 3:58 AM

शाळकरी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली असून, बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई - शाळकरी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली असून, बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड, किल्ले बनविण्याकडे बच्चे कंपनीचा कल आहे. लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करत आहेत.लालबाग, गिरणगाव, गिरगाव, शिवडी आणि कोळीवाड्यातील परिसरात किल्ले बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. दगड-मातीचा ढिगारा, रंग, विटा, झेंडे, महाराज आणि मावळ्यांच्या प्रतिकृती यांचा वापर करून रौद्र स्वरूपाचे किल्ले बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत किल्ले बनविण्याची प्रथा कमी होत आहे. तुरळक ठिकाणी किल्ले बनविले जात आहेत. कारण मुंबईत टॉवर आणि बिल्डिंग संस्कृती वाढली आहे. जागेचा अभाव असल्याने किल्ले बनविण्याची प्रथा कमी होत आहे. डिजिटल युगामुळे सर्वमंडळी मोबाइलवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त झाले आहेत.मुंबईत अमराठी लोकांचे वास्तव्य वाढल्याने किल्ले बनविण्याची परंपरा कमी झाली आहे. ठाणे, कल्याण या भागात किल्ले जास्त प्रमाणात बनविले जात आहेत. शिलाहार काळापासून किल्ल्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर, मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक म्हणून किल्ल्यांकडे पाहिले गेले. त्यामुळे किल्लांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वाढले. हाच इतिहास आठवण्यासाठी आणि लहान मुलांना तो समजून घेण्यासाठी किल्ले बनविणे आवश्यक आहे, असे लालबाग येथे राहणारे ऋग्वेश सातपुते यांनी सांगितले.प्रतापगड, रायगड, माहुली, सिंहगड, पन्हाळा गड, मुरुड जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला या किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्यात येते. किल्ले बनविल्याने किल्लांचा अभ्यास, यांचे रूप, पराक्रम यांची माहिती मिळते. किल्ला बनविण्यास सुरुवात केली असून, किल्ल्यावर झाडे येण्यासाठी मातीत मोहरी किंवा जिरा टाकून खराखुरा किल्लाचे रूप देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मयूर भोसले यांनी सांगितले.विक्रम यंदे यांनी सांगितले की, परीक्षा झाली की, दिवाळीत किल्ले बनविण्याकडे ओढला जात असायचो. किल्ल्यावर पुस्तके वाचून किल्ल्याचा अभ्यास करून मागील १२ वर्षांपासून किल्ले बनवतोय. आतापर्यंत रायगड, तोरणा, सिंधुदुर्ग, देवगिरी, राजगड, पुरंदर हे किल्ले बनविले आहेत. नोकरीनिमित्त आणि इतर कामांमुळे किल्ले बनविण्यासाठी वेळ मिळत नाही, किल्ले बनविण्याची आवड कमी झाली नाही.

टॅग्स :दिवाळीमुंबई