शालेय पोषण आहार कंत्राटावरून वाद

By admin | Published: July 16, 2017 03:14 AM2017-07-16T03:14:24+5:302017-07-16T03:14:24+5:30

महापालिकेच्या व खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट बंगळुरूच्या अक्षयपात्र संस्थेला देण्याचा प्रस्ताव वादात सापडला

Children's Nutrition Diet Contracts | शालेय पोषण आहार कंत्राटावरून वाद

शालेय पोषण आहार कंत्राटावरून वाद

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या व खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट बंगळुरूच्या अक्षयपात्र संस्थेला देण्याचा प्रस्ताव वादात सापडला आहे. तीनशे कोटी किमतीचा भूखंड या संस्थेला दिला जाणार आहे. मात्र मुंबईतील महिला बचतगटांनी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर विरोध करणाऱ्या संस्थांची चौकशी करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मध्यान्ह भोजनाच्या पुरवठ्याकरिता या संस्थेला स्वयंपाकगृहासाठी मोफत जागा देण्याचा प्रस्ताव नुकताच गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. प्रथम पाच हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० हजार मुलांना पोषण आहार देण्यात येणार आहे. फक्त पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यापाठोपाठ आता
महिला बचतगटांनीही विरोध सुरू केला आहे.
बंगळुरूची ही संस्था बदनाम असून त्यांच्या आहारातून अनेकदा विषबाधा झाली आहे. शिजवलेल्या डाळींमध्ये उंदीर व पाली आढळलेल्या आहेत, तसेच या संस्थेने शालेय आहारासाठी सरकारकडून अनुदानही लाटले आहे.
देश-परदेशातून बेकायदेशीररीत्या देणग्याही गोळा केल्या आहेत. कालिना येथील मोक्याच्या जागेवरील ३०० कोटींच्या भूखंडावर डोळा ठेवूनच या संस्थेने पालिका विद्यार्थ्यांसाठी मोफत आहार पुरविण्याचे मान्य केले असल्याचा आरोप महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या जयश्री पांचाळ यांनी केला आहे.

महापौरांकडून चौकशीचा इशारा
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला सकस आहार मिळावा म्हणून या संस्थेला काम देण्यात आले आहे. सुरुवातीला ही संस्था पाच हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवेल, नंतर ५० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवणार आहे. यामुळे स्वयंपाकगृहाची व्यवस्था करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. महिला बचतगट पोषण आहार देत होते मग पालिका शाळांमध्ये कुपोषित मुले कशी आढळली याचे उत्तर द्यावे लागेल. अशा संघटना आंदोलन करून विरोध करणार असतील तर त्यांची चौकशी करावी लागेल, असा इशारा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

बंगळुरूची अक्षयपात्र ही संस्था बदनाम असून त्यांच्या आहारातून अनेकदा विषबाधा झाली आहे. शिजवलेल्या डाळींमध्ये उंदीर व पाली आढळलेल्या आहेत.

२००२मध्ये मुंबईतील महिला बचतगटांना पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्याचे काम मिळाले होते.

४५०
मुंबईतील महिला संस्था सध्या हे काम करीत असून जवळपास सात हजार महिला या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्यामागे चार रुपये १३ पैसे ते सहा रुपये १८ पैसे इतके अनुदान आहे. या कामाची बिले अनेकदा महिनोन्महिने मिळत नसल्याने महिलांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून पोषण आहार सुरू ठेवला असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.

Web Title: Children's Nutrition Diet Contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.