Join us

रुणवाल फॉरेस्टमधील चिमुकले भटक्या श्वानांविरोधात रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:41 AM

जेवण देण्यावरून रहिवासी आणि दाम्पत्यातील वाद चिघळला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांजूरमार्ग येथील रुणवाल फॉरेस्टमध्ये भटक्या श्वानांना जेवण देण्यावरून सुरू असलेला वाद आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. श्वानप्रेमी दाम्पत्यावर स्थानिक रहिवाशांकडून झालेल्या हल्ल्यापाठोपाठ स्थानिक रहिवाशांनी श्वानापासून सावध राहा म्हणत चिमुकल्यांसहित रस्त्यावर उतरले.  

रुणवाल फॉरेस्टमध्ये आठ टॉवर्समध्ये अंदाजे साडेचार हजार रहिवासी आहेत. श्वानांकडून होत असलेल्या हल्ल्यांविरोधात श्वानांना जेवण देणाऱ्या प्राणीप्रेमींना विरोध करण्यात येत आहे. ९ ऑक्टोबर रोजी श्वानांना जेवण देत असताना स्थानिक रहिवाशांच्या जमावाकडून दिया साहा यांना मारहाण झाली. हे प्रकरण पार्क साइट पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तक्रारदार दिया साहा यांच्या तक्रारीवरून जमावाविरुद्ध गुन्हा नोंदविला. तर, अन्य रहिवाशांच्या तक्रारीवरून दिया विरुद्ध गुन्हा नोंदविला. या हल्ल्यानंतरही स्थानिक १० ते १५ जणांच्या ठरावीक जमावाकडून हातात काठ्या घेऊन फिरतात, माझे स्वतःचे श्वान घेऊन जाण्याचीही भीती  वाटते. तसेच, घर खाली करण्यासाठी दबाव वाढल्याचेही दियाने नमूद केले. 

दुसरीकडे, स्थानिक रहिवाशांनी चिमुकल्यासह हातात बॅनर्स घेत भटक्या श्वानांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.  श्वान चावण्याच्या घटना वाढत आहेत. जवळपास शेकडो हल्ले झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

 रात्रीच्या सुमारासच  जेवण देतो जेव्हा खाली कोणी नसते अशावेळी जेवण देण्यासाठी ठरवून दिलेल्या जागेतच भटक्या श्वानांना जेवण देतो. तरी देखील आधीच्या घटनांचा उल्लेख करत श्वानांना जेवण देण्यासाठी कोणीही पुढाकार घेऊ नये म्हणून खटाटोप असल्याचे दिया सांगतात.

श्वानाच्या भीतीने मुलांना घरात कोंडून ठेवण्याची वेळ आली आहे. आम्हालाही श्वाना विषयी प्रेम आहे. मात्र, त्यांना जेवण देण्याची जागा सोसायटी बाहेर करावी एवढीच विनंती केली. भटके श्वान वाढत आहे.  मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या जागेतच श्वानाना जेवण दिले जात आहे. श्वानाची संख्या वाढत आहे. - परेश रीळकर, स्थानिक रहिवासी

श्वानप्रेमी चुकीच्या पद्धतीने श्वानांना खाऊ घालत आहेत. ज्या भागात मुले खेळतात त्या जागेवरच खाण्यास सुरुवात केल्यामुळे श्वानांकडून चावण्याच्या घटना वाढत आहे. लहान मुलांना खेळणे अवघड झाले आहे. दिया साहा आणि त्यांच्या पतीनेच आधी हल्ला चढविला. आम्ही चौकशी केली तेव्हा मात्र त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते. त्यांनीच आधी हल्ला चढविला. - दिलीप चिंचोलकर, स्थानिक रहिवासी, रुणवाल फॉरेस्ट