साहित्याची रुची वाढवण्यास बाल साहित्य संमेलन उपयोगी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांचे मत
By स्नेहा मोरे | Published: March 4, 2024 06:54 PM2024-03-04T18:54:30+5:302024-03-04T18:54:47+5:30
Mumbai News: मुलांना कथा, कवितेचा लळा लावण्यासाठी, त्यांची वाचनाची गोडी वाढवण्यासाठी, साहित्यात रुची निर्माण करण्यासाठी बाल साहित्य संमेलन उपयोगी ठरते, असे मत बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केले.
मुंबई - मुलांना कथा, कवितेचा लळा लावण्यासाठी, त्यांची वाचनाची गोडी वाढवण्यासाठी, साहित्यात रुची निर्माण करण्यासाठी बाल साहित्य संमेलन उपयोगी ठरते, असे मत बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केले.
चेंबूर वाशी नाका येथील अयोध्यानगर महापालिका मराठी शाळा आणि रोटरी क्लब ऑफ चेंबूर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्यानगर शाळेच्या सभागृहात बालकुमार मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कंकाळ बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून रोटरी क्लब चेंबूर, मुंबईचे अध्यक्ष किरण पाटील आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी मीना नाईक उपस्थित होत्या.
यावेळी प्राजक्त देशमुख लिखित आणि मीना नाईक दिग्दर्शित ‘सातवी पास’ या नाटकाचा प्रयोग पार पडला. एकनाथ आव्हाड लिखित ‘मला उंच उडू दे..!’ ही नाट्यछटा युवा कलाकार तृष्णिका शिंदे हिने यावेळी सादर केली. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कलाही जोपासावी, असा सल्ला मान्यवरांनी दिला.
कोळी नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर
अयोध्यानगर महापालिका मराठी शाळेतील मुलांनी कोळी नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डॉ. सुमन नगरकर, प्रकाश पारखी, ज्योती कपिले, मेघना साने आणि हेमंत साने यांनी मुलांसाठी कथा, कविता, गाणी, नकलांचा ‘आनंदयात्री कार्यक्रम’ सादर केला. कार्यक्रमाचे नियोजन बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.