लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाचा फटका जसा विविध क्षेत्रांना बसला; तसाच तो रंगभूमीलाही बसला. सध्या नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू आहेत आणि व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे प्रयोग सर्व नियम पाळून होत आहेत. परंतु बालनाट्यांना मात्र सादरीकरणासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. परिणामी, यंदा २० मार्च रोजी झालेल्या ‘जागतिक बालरंगभूमी दिनी’सुद्धा बालनाट्ये विंगेतच विश्रांती घेत राहिली.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागला आहे. परिणामी, बालनाट्यांना परवानगी कधी मिळेल, यावर प्रश्नचिन्हच आहे. गेल्या वर्षीही या काळात कोरोनाने डोके वर काढल्याने, नाट्यगृहांवर पडदा पडला होता. यंदाही चित्र फारसे वेगळे नाही. बालनाट्यांना नजीकच्या काळात परवानगी मिळाली नाही तर सुट्टीचा काळ वाया जाण्याची शक्यता बालरंगभूमीवर वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या बालनाट्यांना, बच्चेमंडळींसह त्यांच्या पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोनाने त्यावर पाणी फिरवले.
यंदा तरी बालनाट्ये सुरू होतील, अशा आशेवर असणाऱ्या या क्षेत्रातील मंडळींपुढे अद्याप पेच कायम आहे. ऑनलाइनच्या नावाखाली सतत डोळ्यांना मोबाइल चिकटवून बसलेल्या मुलांना, त्यापासून थोडे बाजूला काढण्यासाठी बालनाट्यांचा उत्तम पर्याय होता. मात्र, बालनाट्यांच्या सादरीकरणासाठी परवानगी नसल्याने, त्याचाही काही उपयोग नसल्याचे एकूणच चित्र आहे.