छत्र्यांच्या माध्यमातून दिला मुंबईकरांना संदेश, जनजागृतीसाठी मुलांचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 09:17 PM2018-06-10T21:17:40+5:302018-06-10T21:29:31+5:30
काही संस्था वेगळ्या पद्धतीनं समाजात जनजागृती करत असतात. लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनंही असाच एक उपक्रम राबवला आहे.
मुंबई- सध्या राज्यभरात पावसाळा सक्रिय झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दैना उडवली असतानाच प्रशासनाकडूनही मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही संस्था वेगळ्या पद्धतीनं समाजात जनजागृती करत असतात. लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनंही असाच एक उपक्रम राबवला आहे. गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक पृथ्वीराज कांबळी, संचालक सागर कांबळी यांनी याचं आयोजन केलं आहे.
या उपक्रमात जवळपास 8 मुलांनी भाग घेतला होता. मुलांनी छत्र्यांवर अॅक्रेलिक रंगाच्या साहाय्यानं मुंबईकरांच्या सुरक्षिततेसंदर्भात सूचना छापल्या आहेत. जवळपास 4 तास हा छत्र्या रंगवण्याचा उपक्रम सुरू होता. सध्याची शेतकरी आत्महत्येची परिस्थिती या मुलांनी छत्रीच्या माध्यमातून पुरेपूर रेखाटली आहे.
प्लॅस्टिक बंदी राबवली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याची भावनाही मुलांना छायाचित्रांच्या माध्यमातून मांडली आहे. तसेच प्लॅस्टिकमुळे सगळे नाले तुंबून पुन्हा 26 जुलैसारखी परिस्थिती उद्भवू नये, असा संदेश मुलांना अॅक्रेलिक रंगांच्या माध्यमातून दिला आहे.