मुंबई : लहान मुलाच्या ताब्यासाठी सासरे आणि जावयामधील वाद मिटत नसल्याने, अखेरीस उच्च न्यायालयाने दोघांमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी त्या मुलाचाच आधार घेतला. न्यायालयाने त्या दोघांना पंधरवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी मुलाच्या उपस्थितच एकमेकांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. मुलाचा ताबा मिळावा, यासाठी २०२१ मध्ये वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुलाच्या आईला कॅन्सर झाला होता. ती उपचारासाठी माहेरी गेली होती आणि तिथे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातू आजोबांकडेच राहिला. त्यानंतर, वडील मुलाचा ताबा मागण्यासाठी गेले असता आजोबांनी नकार दिला. त्यामुळे वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने १ फेब्रुवारी, २०२२ रोजी आजोबांना नातवाचा ताबा त्याच्या वडिलांना देण्यास सांगितले. मात्र, दर पंधरा दिवसांनी आजोबा सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नातवाला भेटू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले.
जावई नातवाला भेटू देत नसल्याने आजोबांनी न्यायालयात धाव घेतली. जावयाविरोधात अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी सासऱ्यांनी केली. ९ मे रोजी न्यायालयाने जावयाला मुलासह न्यायालयात हजर राहण्यास सांगितले, परंतु जावई न्यायालयात हजर राहिला नाही.
न्यायालयाने २८ मे रोजी जावयाला मुलासह सासऱ्याच्या घरी जाण्यास सांगितले. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नातू आजोबांच्या घरी राहील, असे न्यायालयाने म्हटले. या भेटीबाबतही सासरे व जावई तक्रार करू लागले.
२८ मे रोजी झालेल्या भेटीबाबत दोघांनाही तक्रारी आहेत. मात्र, त्यांच्यातील संवाद रचनात्मक आहे. या दोघांमधील वाद सोडविण्यासाठी अशा भेटी होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.
मुलाच्या आईच्या पालकांनाही काही काळ त्याला भेटता यावे. मुलाच्या भावनिक पोषणाचा हा महत्त्वाचा भाग आहे, असे न्या.नितीन बोरकर व न्या.सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने म्हटले. त्यानंतर, मुलाच्या वडिलांनी व आजोबांनी एकमेकांना अशाच पद्धतीने भेटण्याचे व एकमेकांत दोष न शोधता दोघांमध्ये समान काय आहे, हे शोधू, अशी हमी न्यायालयाला दिली.
संवादादरम्यान मुलाकडून काय करून घ्यावे, यावरून जावयात व सासऱ्यांमध्ये मतभेद आहेत. त्यांनी मुलाचे हित विचारात घेऊन त्यांच्यातील मतभेद सोडवावेत, असे न्यायालयाने म्हटले.