मुंबई : अभ्यासावरून आई-वडलांसह बहिणींकडून सतत मिळणाऱ्या ओरड्याला कंटाळून ९ वर्षांच्या चिमुरडीने घर सोडले. ही धक्कादायक घटना विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घडली. मात्र विक्रोळी पोलसांनी अवघ्या १२ तासांत या मुलीचा शोध घेत तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ९ व १० जुलै दरम्यान हा प्रकार घडला.ही मुलगी आई-वडील व चार बहिणींसोबत राहते. तिसऱ्या इयत्तेत शिकणारी चिमुरडी गुरूवारी दुपारी शाळेतून घरी आली. घरी आल्या आल्याच मोठी बहीण अभ्यासावरून ओरडली. सततच्या दरडावणीला कंटाळलेल्या या चिमुरडीने रागाच्या भरात घर सोडले. ती खेळायला बाहेर गेली असावी या अंदाजाने घरचे निवांत होते. मात्र दहा वाजले तरी मुलगी घरी न परतल्याने पालकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र मुलगी कुठेच न सापडल्याने त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक दिनेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींची घरे या पथकांनी गाठून चौकशी सुरू केली. तेव्हा एका मैत्रीणीच्या घराजवळून पायी जाणारी ही मुलगी पथकाच्या नजरेस पडली. तिला ताब्यात घेऊन प्रथम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे चौकशी करून मग नंतर तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. रात्रभर कुठे होतीस, या पोलिसांच्या प्रश्नावर तिने वेगवेगळी उत्तरे दिल्याचे समजते. (प्रतिनिधी)
अभ्यासाच्या तगाद्याने चिमुरडीचे पलायन
By admin | Published: July 11, 2015 11:46 PM