मुंबई : सायकल चालवताना झालेल्या अपघातात अंतर्गत रक्तस्रावामु ळे पाय कापण्याची वेळ आलेल्या सांगलीतील शेतकऱ्याच्या मुलाच्या पायावर मुंबईत तब्बल अकरा तासांची शस्त्रक्रिया करून त्याचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.सांगलीतील जत येथील कोशारी गावातील शेतकरी किसान चव्हाण यांचा तेरा वर्षांचा मुलगा सोहम सायकलने शाळेत जात असताना अपघात होऊन त्याच्या पायाला गंभीर इजा झाली. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्यांची अवस्था गंभीर झाली. काही आठवड्यात चव्हाण यांनी मुलाला जिल्ह्यातील तीन हॉस्पिटलमध्ये हलवले असता प्रत्येक ठिकाणी त्यांना पाय कापून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. उपचारासाठी पैसे नसलेले चव्हाण दाम्पत्य मुलाला घेऊन मुंबईत आले आणि त्यांनी मानखुर्द येथे भाड्याची खोली घेतली. ओळखीच्या लोकांमार्फत त्यांनी मुलाला अॅन्टॉप हिल येथील सेंगोल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉ. प्रतीक हेगडे आणि डॉ. मिशील पारीख यांनी सलग अकरा तास शस्त्रक्रिया करून पाय वाचवला. आता सोहमची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. प्रतीक हेगडे यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेमुळे वाचला मुलाचा पाय, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 2:43 AM