पोलिसांनी रोखले म्हणून डोळ्यात फेकली मिरचीपूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:52 AM2018-08-06T01:52:11+5:302018-08-06T01:52:20+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी रोखले.
मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी रोखले. मात्र, न थांबता तेथील वॉर्डनला धक्का देत निघून जाण्याच्या प्रयत्नात ते खाली कोसळले. वाहतूक पोलिसाने त्यांना समज देत सोडून दिले. मात्र, दुचाकीस्वार काही वेळाने पुन्हा तेथे धडकले. वाहतूक पोलिसाला मारहाण करून त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळ काढल्याची घटना साकीनाका येथे घडली.
या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शमीउल्लाह भालदार (५४) यात जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भालदार हे अंधेरी-कुर्ला रोड परिसरात वाहतुकीचे नियोजन करत होते. त्याच दरम्यान दुचाकीस्वार तरुण त्यांना भरधाव वेगाने येताना दिसले. त्यांनी दोघांनाही रोखले. मात्र, न थांबता तेथील वॉर्डनला धक्का देत निघून जाण्याच्या प्रयत्नात ते खाली कोसळले. भालदार यांनी दोघांना ताब्यात घेत समज दिली. त्यानंतर त्यांना सोडून दिले.
तासाभराने दोघेही दुचाकीवरून परत तेथे आले. त्यांनी भालदार यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्यांना मारहाण केली. नागरिक जमताहेत हे पाहून त्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच, साकीनाका पोलीस तेथे दाखल झाले. भालदार यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. भालदार यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.