रणरणत्या उन्हात थंडाव्याचे आसरे
By admin | Published: April 25, 2017 01:18 AM2017-04-25T01:18:22+5:302017-04-25T01:18:22+5:30
शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी लागली असली, तरी शहरासह उपगनरांत तापमानाचा पारा चढलेला असल्याने लोकांना घराबाहेर
अक्षय चोरगे / मुंबई
शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी लागली असली, तरी शहरासह उपगनरांत तापमानाचा पारा चढलेला असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही नकोसे वाटत आहे. अशा परिस्थितीत थंड हवेच्या शोधात लोकांची पावले आपोआप उद्यानांकडे वळत आहेत. मात्र शहरातील बहुतेक उद्यानांची दुरवस्था असताना चेंबूरमधील उद्यानांना मात्र जत्रेचे रूप आल्याचे दिसत आहे. महापालिकेने येथील उद्यानांची अचूक देखरेख केल्याने संबंधित उद्यानांना अच्छे दिन आले आहेत.
चेंबूरमधील ना.ग. आचार्य उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, डी.के. सांडू उद्यान, स्वातंत्र्यसैनिक उद्यान, महात्मा गांधी मैदान, युनियन पार्क अशा प्रमुख उद्यानांमध्ये दुपारच्या वेळीही बच्चेकंपनीसह पालक मंडळी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. याउलट सायंकाळी तर या उद्यानांना जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. बहुतेक उद्याने ही दुपारीही खुली असून स्थानिक या ठिकाणी विसाव्यासाठी येत आहेत. याउलट दुपारच्या वेळी बंद असलेली काही उद्याने दुपारीही खुली ठेवण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
उद्यानांवर अधिकाऱ्यांचा वॉच-
पालिकेचे उद्यान विभागातील अधिकारी स्वत: उद्यानांच्या कामांमध्ये लक्ष घालत आहेत. उद्यानांच्या साफसफाईसह येथील झाडा-झुडपांची देखरेख, मनोरंजक खेळण्यांची सद्य:स्थिती यांचा आढावा अधिकारी जातीने घेतात, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तरुणाईचीही पसंती-
बच्चेकंपनीसह तरुणाईही या उद्यानांचा आडोसा घेत असल्याचे दिसत आहे. गर्दीच्या शहरात एकांत म्हणून उद्यानाला तरुणाईची पसंती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही उद्यानांत खुल्या व्यायामशाळा उभारल्याने व्यायाम करण्यासाठीही तरुण मंडळी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.