Join us

चिमुरडी बनली काही तासांसाठी डॉक्टर

By admin | Published: May 22, 2015 10:45 PM

सायन रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची तपासणी झाल्यावर औषध म्हणून चॉकलेट दिले जात होते. एका लहान डॉक्टरची ओपीडी आणि मग वॉर्ड राउंडने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले.

मुंबई : सायन रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची तपासणी झाल्यावर औषध म्हणून चॉकलेट दिले जात होते. एका लहान डॉक्टरची ओपीडी आणि मग वॉर्ड राउंडने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले. आज मी तुमच्या रुग्णालयात रुजू झाले, असे १० वर्षीय डॉ. अंजली सूर्यवंशी हिने अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांना सांगितले. काही तासांसाठी का होईना चिमुरड्या अंजलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले.शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सायन रुग्णालयात सगळेच जण आश्चर्यचकित झाले. नेहमीप्रमाणे बालरोगचिकित्सा विभागप्रमुख डॉ. ममता मंगलानी वॉर्डची राउंड घेत होत्या. पण आज त्यांच्याबरोबर डॉ. अंजली रुग्णांची चौकशी करीत होती. मेक अ विश फाउंडेशन आणि सायन रुग्णालयाने मिळून अंजलीचे डॉक्टर होण्यचे स्वप्न काही तासांसाठी सत्यात उतरवले. अंजली सध्या पाचवीत शिकत आहे. तिला मेंदूचा टीबी झाला आहे. वाशीच्या महापालिका रुग्णालयात गेल्या एका महिन्यांपासून अंजलीवर उपचार सुरू आहेत. आरतीचे वडील हनुमान सूर्यवंशी यांनी सांगितले, की काही महिन्यांपूर्वी अंजलीला चक्कर येऊन ती पडली. आम्ही तत्काळ तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्या वेळी तिला मेंदूचा टीबी झाल्याने निदान झाले. अंजलीला चौथीत ९० टक्के गुण मिळाले आहेत. डॉ. मंगलानी यांनी अंजली खूप हुशार मुलगी असल्याचे सांगितले. तिला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. भविष्यात ती डॉक्टर होईल, अशी आशा करू या. डॉ. अंजलीने लहान मुलांच्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. त्यांची तपासणी केली आणि त्यांना औषधे दिले. यानंतर अंजली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना भेटण्यास गेली. तेव्हा त्यांच्याशी हात मिळवून ‘आज मी तुमच्या रुग्णालयात रुजू होत आहे,’ असे सांगितले. डॉ. मर्चंट म्हणाले, की ही मुलगी आजारी आहे. तिला आशा देऊ शकलो तर अजून काय हवे. अंजलीला भविष्यात काही मदत लागल्यास नक्कीच मदत करू. (प्रतिनिधी)