देवनार पाड्यातील स्मशानभूमीतील चिमणी सहा महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:58+5:302021-07-07T04:07:58+5:30
मुंबई : देवनार पाडा येथील स्मशानभूमीतील चिमणी गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीत धूर ...
मुंबई : देवनार पाडा येथील स्मशानभूमीतील चिमणी गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीत धूर साठून राहत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना या धुराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गोवंडी, चेंबूर, घाटला, आनंद नगर, लुबिनिया बाग, आचार्य नगर, सुभाष नगर, मुक्ती नगर परिसरातील नागरिक मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याकरिता या स्मशानभूमीचा वापर करतात. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर निघणारा धूर आकाशाच्या दिशेने न जाता खालीच पसरतो. परिणामी अंत्यसंस्काराला आलेल्या नातेवाईकांना व कर्मचाऱ्यांना या धुराचा त्रास होतो. या धुरामुळे आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील श्वसनाचे विकार होत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अशातच देवनार पाडा स्मशानभूमी समस्येच्या गर्तेत अडकलेली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी पालिकेला पत्र दिले आहे. तसेच दोन-तीन दिवसात पालिकेने चिमणी सुरू न केल्यास माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व माजी नगरसेविका सीमा माहुलकर यांच्या नेतृत्वात पालिका अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा नगराळे यांनी दिला आहे.