कैद्यांच्या सांगण्यावरून चिमुरड्याचे अपहरण;आर्थर रोड कारागृहाबाहेर रंगला फिल्मी थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:58 AM2018-02-15T02:58:34+5:302018-02-15T02:58:54+5:30
न्यायालयातून आरोपींना घेऊन गाडी कारागृहाबाहेर थांबते. आरोपींना आत नेत असताना, नातेवाइकांची भेटण्यासाठी गडबड सुरू होते. याच वेळी भेटायला आलेल्या साथीदारांना एक आरोपी प्रतीक्षालयात बसलेल्या मुलाला पळवून न्या, असे सांगतो.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : न्यायालयातून आरोपींना घेऊन गाडी कारागृहाबाहेर थांबते. आरोपींना आत नेत असताना, नातेवाइकांची भेटण्यासाठी गडबड सुरू होते. याच वेळी भेटायला आलेल्या साथीदारांना एक आरोपी प्रतीक्षालयात बसलेल्या मुलाला पळवून न्या, असे सांगतो. तत्काळ साथीदार मुलाला गाडीत बसवितात. मुलाची आई गाडीच्या दिशेने धाव घेते. तिला चाकूचा धाक दाखवत गाडी सुरू केली जाते. आई गाडीमागे धावते... हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून, सोमवारी आर्थर रोड कारागृहाबाहेर दिवसाढवळ्या रंगलेला थरार आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
गोवंडीच्या भारतनगर परिसरात परवीन बानो गणेश पंडाराम (२५) ही महिला पती आणि दोन मुलांसोबत राहते. पती गणेश पंडाराम हा शिवाजीनगर येथील हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या ३ महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी दुपारी २च्या सुमारास बानो यांनी पतीला भेटण्यासाठी मुले मुझम्मील (६), नवाजसह (२) आर्थर रोड कारागृह गाठले. प्रतीक्षालयात मुझम्मीलला बसवून नवाजसोबत कारागृहाबाहेर पतीला भेटण्यासंदर्भात त्या चौकशी करीत होत्या. त्याच वेळी तिच्या परिसरात राहणारे बारक्या, टिपू, समीर, कलाम व त्याचे इतर साथीदार कारमधून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सद्दामला भेटण्यासाठी उतरले. काही समजण्याच्या आतच सद्दाम व त्याच्यासोबत शिक्षा भोगत असलेला झैद याने त्याला भेटायला आलेल्या बारक्याला ‘गण्या के बच्चे को उठाव और आगे सें अरविंद को उठाव,’ असे सांगितले.
त्यांचे शब्द कानी पडताच परवीनने मुलाकडे धाव घेतली. मात्र, त्या पोहोचण्यापूर्वीच साथीदारांनी मुलाला ताब्यात घेतल होते. परवीन गाडीजवळ येताच, तिला चाकूचा धाक दाखविला आणि मुलाला घेऊन ते निघून गेले. परवीन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘मी मुलासाठी गाडीमागे धावत होते. पुढे त्यांनी पतीचे मित्र अरविंदलाही गाडीत बसविले. दोघांनाही घेऊन माझ्या डोळ्यांदेखत ते निघून गेले. मी पोलिसांकडेही मदत मागितली. मात्र, कोणीही पुढे आले नाही. पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी. मंगळवारी मुलगा रडत घरी आला. त्याला दमदाटी केल्यामुळे तो मानसिक तणावाखाली आहे,’ असे परवीन यांनी सांगितले.
याबाबत आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. आगावणे यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, चौकशी सुरू आहे, असे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
काय आहे वाद?
आर्थर रोड कारागृहात कैद असलेल्या सद्दाम आणि झैद यांचा गणेश पंडारामवर राग होता. एका बांधकामाचे कंत्राट त्या दोघांऐवजी गणेशला मिळाल्याने त्यांच्या रागात भर पडली. मुलाच्या अपहरणानंतर रात्री १० ते १२ जणांनी घरात घुसून धमकावल्याचेही परवीन यांनी सांगितले.