चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:23+5:302021-07-10T04:06:23+5:30

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग घेण्यास शिक्षण विभागाने टप्प्याटप्याने परवानगी दिली असली ...

Chimukalya's holiday mood remained, I forgot to study | चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर

Next

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग घेण्यास शिक्षण विभागाने टप्प्याटप्याने परवानगी दिली असली तरी अद्याप त्याखालील इयत्तांसाठी कोणत्याही सूचना विभागाकडून देण्यात आल्या नाहीत. सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली असली तरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सद्यस्थितीत सुरू होण्याची चिन्हे नाहीत, हे स्पष्ट आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणामुळे ही चिमुकली अभ्यासाला लागली नाहीत आणि यामुळे पालक शिक्षक मात्र हैराण झाले आहेत. शाळा बंद असल्याने अजूनही यांचा सुट्टीचा मूड कायम असल्याच्या प्रतिक्रिया पालक देत आहेत.

ऑनलाइन अभ्यासामुळे सगळ्यांच्याच अभ्यासाची हेळसांड झालेली असताना लहान मुलांच्या अभ्यासाचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, असे मत पालक व्यक्त करत आहेत. लहान वयात एकमेकांच्या सहवासातून, शिक्षकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून विद्यार्थी ज्या संकल्पना, अक्षर ओळख शिकतात त्यांच्यापासून ते वंचित राहत आहेत. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे, समरस करणे शिक्षकांसाठी हे मोठे आव्हान ठरत असल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. वर्गात असताना इतर मुलांसोबत म्हणणे, कविता म्हणणे, अक्षर, प्राणी यांची तोंडओळख होणे या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सहज, सोप्या होत असतात; मात्र ऑनलाइन शिक्षणात मुलांना त्याचा कंटाळा येत असल्याने मुलांचा शिक्षणाचा पाया कच्चा राहत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.

अभ्यासासाठी अशी ही टाळाटाळ

अनेकदा ही मुले ऑनलाइन नावाखाली गेम्स खेळताना, कार्टून व्हिडिओ बघताना सापडत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. ऑनलाइन वर्गांना ही मुले बसतात खरी; पण त्यानंतर शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास करताना मात्र ते टाळाटाळ करतात. प्रत्यक्षात शाळा सुरू असताना किमान ४ ते ५ तास शाळॆत असणारी ही मुले घरी असताना मात्र कोणीतरी आले, पाणी प्यायचे आहे, भूक लागली आहे, बाहेर जायची कारणे देऊन अभ्यासावरून उठून टाळाटाळ करत असल्याची कारणे पालक देतात.

आपला घरातूनच अभ्यास बरा

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार शिक्षण विभाग घेत आहे. लहान वर्गातील विद्यार्थ्यांना तरी शाळेत पाठविणे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेला धोक्यात घालणे असल्याने त्यांना घरूनच शिकू द्यावे. ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास आणखी काही महिने तरी करू द्यावा, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टीतून, गप्पांतून नवीन संकल्पना आणि विषय समजावून द्यावेत, दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षरओळख करून द्यावी, सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्याच्यातून त्यांना धडे द्यावेत, असे तज्ज्ञ पालकांना सुचवितात.

पालकांचीच अडचण वेगळीच

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा अभ्यास पूर्णपणे घरातून होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी सतत त्यांच्यासोबत असणे, वेळ व्यतीत करणे पालकांना गरजेचे झाले आहे. राज्यातील अनेक उद्योग आणि नोकऱ्या अनलॉक होत असताना कामावर जाणाऱ्या पालकांसाठी हे अडचणीचे ठरत आहे. त्यातच जे पालक वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांच्यासाठीही त्यांच्या ऑफिसच्या कामाच्या वेळेत मुलांना ऑनलाइन वर्गात अभ्यासाला घेऊन बसणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.

-------------------

वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने ऑफिसच्या मिटिंग आणि त्याचवेळी शाळॆतील मुलांची उपस्थिती एकत्र करणे कठीण होत आहे. अनेकदा ऑनलाइन वर्गांना पूर्ण वेळ उपस्थित रहावे लागत असल्याने इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

वैशाली मणेरीकर, पालक.

ऑफिस सुरू झाले आहे, त्यामुळे घरात थांबू शकत नाही; मात्र मुलांसाठी आम्हा दोघांपैकी कोणाला तरी एकाला आलटून पालटून घरी थांबावे लागत आहे. शाळेच्या वर्गांना सोबत उपस्थित न राहिल्यास मुले गेम्स खेळण्यासारखे कार्यक्रम करत राहतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात.

मीनाक्षी खैरे, पालक.

Web Title: Chimukalya's holiday mood remained, I forgot to study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.