चिमुकले पोलीस बाबाचे चित्रातून वाढवत आहेत मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:45+5:302021-05-15T04:06:45+5:30

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ऑनड्युटी २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस बाबाच्या कामाला सलाम करत चित्रांच्या माध्यमातून ...

Chimukle police are raising morale through Baba's picture | चिमुकले पोलीस बाबाचे चित्रातून वाढवत आहेत मनोबल

चिमुकले पोलीस बाबाचे चित्रातून वाढवत आहेत मनोबल

Next

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऑनड्युटी २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस बाबाच्या कामाला सलाम करत चित्रांच्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढविण्याची धडपड पोलिसांची मुले करत आहेत. दादर पोलीस वसाहतीत राहण्यास असलेल्या शिवराज म्हेत्रे यांची १० वर्षांची मुलगी तर कोरोना काळात नागरिकांना घरी राहण्याचा संदेश देत, तिच्या बाबाची व्यथा मांडण्यासोबतच त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांचे मनोबलही वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मुंबईतील वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलीस वसाहतींसह शहरात एकूण ४६ पोलीस वसाहती आहेत. यात हजारो पोलीस कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी घरातील मंडळीचा विचार न करता, ही मंडळी कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उतरून आपली कामगिरी बजावत आहे. आजही कर्तव्य बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी सुखरूप पोहोचेल की नाही, ही भीती मात्र पोलीस वसाहतींमध्ये कायम आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक शिवराज म्हेत्रे हे पत्नी मीरा, १० वर्षांची मुलगी सई आणि ५ वर्षांचा मुलगा साईराज सोबत राहतात. पोलीस बाबा दिवसभर कामासाठी बाहेर असतो. त्यातच शाळाही बंद असल्यामुळे दिवसभर घरात असूनही बाबाची भेट होत नाही. त्याच्यासोबत खेळताही येत नाही. अशा वेळी सगळे घरात आहेत आणि आपला बाबा रस्त्यावर एकटा सेवा बजावतोय, ही भावना सईने चित्रातून रेखाटली आहे.

सुरुवातीला लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती चित्रातून मांडली. दुसरीकडे आपले कुटुंब सुखी राहावे, म्हणून पोलीस रस्त्यावर उतरून कार्यरत आहे अशा सर्व महाराष्ट्र पोलिसांनाही ती आपल्या चित्रांच्या माध्यमातून सलामी ठोकत ‘धन्यवाद’ म्हणत आहे. एका चित्रात तिने दमलेल्या बाबाची कहाणी मांडली. यात बाबाला घट्ट मिठी मारलेली मुलगी दाखविली आहे. कुठेतरी हे संकट लवकर संपवून तिलाही बाबाला अशी मिठी मारायची असल्याचे ती दाखवत आहे. सध्या कोरोनामुळे बाबाजवळ येत नाही आहे, त्यामुळे तिच्या भावना ती चित्रातून व्यक्त करते आहे, तर पोलीस, आरोग्य विभाग कोरोना विरुद्ध कशा पद्धतीने लढत आहेत, याबाबतही तिने चित्रातून परिस्थिती मांडली आहे. सातवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या सईच्या या चित्रांची शाळेसह, पोलीस दलातही कौतुक होत आहे. कोरोनावर आधारित आतापर्यंत १० ते १२ चित्रे तिने रेखाटली आहेत.

सईसारखे अनेक जण आपल्या वेगवगेळ्या कलेतून पोलिसांसाठी धडपड करत, नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे आपणही आपली जबाबदारी ओळखून कोरोना योद्ध्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे.

..

Web Title: Chimukle police are raising morale through Baba's picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.