मुंबई : मालाडमध्ये राहाणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. मुलीच्या पालकांनी शनिवारी सकाळी दिलेल्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी खासगी स्कूल चालक व वाहकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चिमुरडी गोरेगाव परिसरातील नर्सरीत शिकते. खासगी स्कूल व्हॅनने ती शाळेतून घरी ये-जा करते. शुक्रवारी ती शाळेतुन घरी आली आणि तिने नाजूक भाग दुखत असल्याची तक्रार वडलांकडे केली. त्यांनी ही बाब पत्नीच्या निदर्शनास आणून दिली. दोघांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरनी मुलीला तपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला. हे ऐकून बिथरलेल्या पालकांनी चिमुकलीला पालिकेच्या रूग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरनेही तेच निदान करताच दोघांनी शनिवारी सकाळी कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रूग्णालयात धाडले. तसेच खासगी स्कूल व्हॅन चालक व वाहकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या घटनेमुळे पिडीत मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे हा प्रकार कोणी केला, कुठे केला याबाबत तीच्याकडून नेमकी माहिती मिळालेली नाही. , असे कुरार पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींबाबत तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ निरिक्षक राघवेंद्र ठाकूर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.
चिमुकलीवर बलात्कार
By admin | Published: August 16, 2015 2:19 AM